पोलीस होता न आल्याने खोटी वर्दी चढवली, पुण्यात तोतया ‘लेडी सिंघम’ला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या एका तरुणीने थेट पोलिसाचा गणवेश खरेदी करून अंगावर चढवला. खांद्यावर दोन स्टारही लावले आणि पोलिसांसारखा रुबाब गाजवायला गेली, परंतु खऱया पोलिसांनी या तोतया लेडी सिंघमला बेडय़ा ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव समिना आसिफ इनामदार ऊर्फ समिना अयुब पठाण (25) असे आहे. आरोपी महिला पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा गणवेश परिधान करून नागरिकांवर प्रभाव आणि रुबाब पाडत होती, परंतु तिचा हा रुबाब पोलिसांनी उतरवला.

पुण्यातील कॅम्प परिसरात पोलिसांच्या वर्दीत वावरणारी ही तरुणी पाहून अनेकांना ती खऱया अर्थाने पोलीस अधिकारी असल्याचे वाटत होते. आरोपी समिनाला पॅम्प परिसरातील एका नामांकित क्लिनिकमध्ये उपचारासाठी डॉक्टरांची वेळ हवी होती. मात्र तिथे गर्दी असल्याने तिला डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळत नव्हती. त्यामुळे तिने थेट पोलिसांचा गणवेश परिधान केला आणि आपण पोलीस अधिकारी असल्याचा आव आणत क्लिनिकच्या रिसेप्शनवर दबाव टाकून लवकर अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला.

समिनाला खरे तर पोलीस व्हायचे होते, परंतु पोलीस न झाल्यामुळे तिने पोलिसांची वर्दी खरेदी करून अंगावर चढवली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी समिनाच्या घराची झडती घेतली असता तिथे पोलिसांचे आणखी काही गणवेश (वर्द्या) आढळून आले आहेत. त्यामुळे यापूर्वीही तिने अशाच प्रकारे कुणाची फसवणूक केली आहे का याचा सखोल तपास सुरू आहे.

…अन् ती खऱया पोलिसांच्या जाळ्यात अडकली

लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे कॅम्प परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी एका खासगी क्लिनिकबाहेर पोलिसांच्या वर्दीत उभी असलेली ही तरुणी त्यांच्या नजरेस पडली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पीएसआय शिंदे यांनी महिला पोलीस कर्मचाऱयांच्या मदतीने तिची चौकशी सुरू केली. तू कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेस? तुझे आयडी कार्ड कुठे आहे? अशा पोलिसी प्रश्नांची सरबत्ती सुरू होताच संबंधित तरुणीची बोलती बंद झाली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ती खोटी पोलीस असल्याचे उघड झाले.