
भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तब्बल 25 ते 30 वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर नवले ब्रीज परिसरात रविवारी रात्री घडला. ट्रक चालकाने तब्बल दीड किलोमीटर वाहनांना उडवून नुकसान केले. आतापर्यंत झालेल्या अपघातापैकी झालेला हा सर्वाधिक मोठा अपघात असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस, स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.
भरधाव ट्रक चालकाचे नवले पुलाजवळ तीव्र उतारावर नियंत्रण सुटले. त्यामुळे पाठीमागून ट्रकची अचानकपणे धडक बसल्याने वाहन चालकांमध्ये घबराट पसरली होती. अपघातात 25 ते 30 वाहनांचे नुकसान झाले असून वाहनात अडकलेल्या चालकाची सुटका करण्यात आली. ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळल्याने परिसरात गोंधळ उडाला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या रेक्स्यु व्हॅन तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरु करण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवानांनी मोटारीत अडकलेल्या चालकासह प्रवाशांना बाहेर काढली. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातात मोठया प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले असून 10 ते 12 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे अग्निशमन दलाने दिली.
दरम्यान, शुक्रवारी (19 नोव्हेंबर) बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ भरधाव मोटारीने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. अपघातात तिच्या चार वर्षांच्या बालकासह तिघे जण जखमी झाले होते.
सुटीचा दिवस, गर्दी अन अपघात
रविवारी असल्याने परिसरातुन बहुतांश नागरिक खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यातच सातराहून मुंबईत जाणाऱ्याची गर्दी वाढली होती. अचानकपणे एक ते दीड किलोमीटर अंतरावर वाहनाचा आवाज येऊ लागला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यावर त्याने 25 ते 30 वाहनांना धडक देत नुकसान केले. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. वाहतूक ठप्प झाली होती.































































