
सामना प्रतिनिधी। राहुरी
राहुरी शहरातील शिवाजी चौकात एका दुकानात अडगळीत 8 फूट लांब अजगर सापडल्याने खळबळ उडाली. पण सर्पमित्रांनी अडगळीत अडकलेल्या या अजगराला सहीसलामत बाहेर काढले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
राहुरी शहरातील शिवाजी चौकात मिक्सर, इलेक्ट्रॉनिक शेगडी दुरुस्तीचे दुकान आहे. आज सकाळी दुकानातील कामगार दुरूस्ती केलेले भांडे घेण्यासाठी म्हणून रॅकजवळ गेला आणि त्याची बोबडीच उडाली. कारण रॅकच्या बाजूलाच अजगर निवांत पहुडला होता. हे बघून काामगाराने तिथून धूम ठोकली व मालकाला याबद्दल सांगितले. त्यानंतर दुकानात अजगर असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि दुकानाबाहेर बघ्यांनी एकच गर्दी केली. यामुळे शिवाजी चौकात काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर सर्पमिञ कृष्णा पोपळघट व अमोल रणसिंग यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी रॅकमधून या अजगराला बाहेर काढले. नंतर त्याला राहुरी वनविभागाच्या ताब्यात दिल्यानंतर नैसर्गिक अदीवासात मुक्त करण्यात आले.
































































