लॉकडाऊन आदळणार नाही, दोन दिवस आधी सूचना देणार! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची स्पष्टोक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे राज्यातील जनतेने लॉकडाऊनची मानसिकता ठेवायला हवी. मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही. लॉकडाऊन अचानक आदळणार नाही, दोन-तीन दिवस आधी पूर्वसूचना देणार असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

आरोग्यमंत्री टोपे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात आज बैठक झाली. लॉकडाऊनमध्ये अनेक अडचणी येतात. त्यासंदर्भात दोघांनी चर्चा केली. लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला पुरेसा वेळ द्यायला हवा यावर दोघांचे एकमत झाले. त्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी नंतर पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला असल्याचे टोपे यांनी सांगितले.

पुढचे पंधरा दिवस महत्त्वाचे

  • पुढचे पंधरा दिवस हे कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यंत महत्त्वाचे आहेत.
  • या कालावधीत रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात येईल.
  • त्यासाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू देणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी दिल्याचेही टोपे यांनी सांगितले.

रेमडेसिवीर किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिले जाईल आणि तिथे गरजू रुग्णांसाठीच त्याचा वापर केला जाईल. या प्रक्रियेवर जिल्हाधिकाऱयांचे नियंत्रण असेल.

ब्रेक द चेन (सोमवारची रुग्णसंख्या)

  • राज्य रुग्ण 51751  मृत्यू 258
  • मुंबई  रुग्ण 6893  मृत्यू 43
  • ठाणे      1465
  • नाशिक  1845
  • पुणे       5034
  • नागपूर  4044
  • संभाजीनगर     656