…तर ऊसपट्टय़ात शेतकरी औषधालाही ‘कमळ’ठेवणार नाहीत – राजू शेट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

उसाची एफआरपी ठरविण्याचे सूत्र सरकारने बदलले तर देशातील ऊस उत्पादक शेतकरी ऊसपट्टय़ात औषधालाही ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाहीत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

पृषिमूल्य आयोगाने आगामी ऊसगाळप हंगामाकरिता ९.५ टक्के रिकव्हरीकरिता २७५० प्रतिटन याप्रमाणे उसाचा हमीभाव मान्य केला आहे. त्यापुढील प्रत्येक वाढीव एक टक्का रिकव्हरीकरिता २९० प्रतिटनप्रमाणे वाढ जाहीर केली आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. तरीही निवडक ऊस उत्पादक शेतकऱयांना दिल्लीला बोलावून व त्यांच्या सांगण्यावरून उसाचे हमीदर पुनर्गठित करण्याचा डाव मोदी सरकार करीत आहे. असे झाल्यास उसाचा दर वाढविला असल्याचे चित्र उभे राहणार असले, तरी मूळ सूत्रात बदल करताना ९.५ ते १० टक्के बेसकरिता प्रतिटन १४५ रुपयांची कपात केली जाणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक ऊस उत्पादकांना दिल्लीला बोलावून घेतले. मात्र, या सोहळ्यात शेतकऱयांना एकही प्रश्न विचारण्याची परवानगी नव्हती. या सोहळ्यात उसाची एफआरपी पुनर्गठित करण्याची, तसेच शेतमालास उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा त्यांनी केली. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पुन्हा शेतकऱयांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याची तयारी हे सरकार करीत आहे.