भिंती रंगवायला 1729 कोटी, कॅन्सर रुग्णांसाठी 25 कोटीही नाहीत का?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी विविध सुधारणांसाठी भरीव आर्थिक तरतुदीची मागणी शासनाकडे केली. 1729 कोटी रुपये फक्त भिंती रंगवण्यावर खर्च केले जातात, मग सेव्हन हिल्स रुग्णालयात कॅन्सर उपचार सुविधेसाठी शासन 25 कोटीही देऊ शकत नाही का, असा सवाल वायकर यांनी  केला. 

मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी 100 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उपचारासाठी तिथे पेट स्पॅनची आवश्यकता असून त्यासाठी 25 कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी रवींद्र वायकर यांनी केली. आरे वसाहतीमध्ये सैनिकी शाळा सुरू करावी तसेच जोगेश्वरीच्या इस्माईल महाविद्यालयामध्ये क्रीडा संकुल उभारण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. मजासवाडीतील 171 नागरिकांना विकासकाने सदनिका दिल्या. मात्र दीड वर्ष झाले तरी त्या त्यांच्या मालकी हक्काच्या झालेल्या नाहीत याकडेही वायकर यांनी लक्ष वेधले.