
पोल्ट्री फार्मवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चाकू, दोरी, रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई संगमवाडी परिसरातील पीएमपीएल बसस्थानकाजवळ करण्यात आली. दिलीप विठ्ठल भोई (वय 28, रा. रेल्वे स्टेशन), विकास दिलीप कांबळे (वय 25, रा. इंदिरानगर), राज्या उर्फ विकास सिताराम लांडगे (वय 35, रा. रेल्वे स्टेशन), रोहित शंकर पाटील (वय 22, रा. गांधीनगर, पिंपळे गुरव ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार नाग्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक संगमवाडी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी परिसरातील एका पोल्ट्री फार्मवर दरोडा टाकून रोकड लुटण्याच्या तयारीत असलेली टोळी रस्त्यालगत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून दिलीप, विकास, राज्या उर्फ विकास, रोहितला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चाकू, दोरी आढळली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड तपास करीत आहेत.































































