… हर बात याद आयेगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनंजय कुलकर्णी

निर्माता, दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार सागर सरहदी यांचे मागच्या आठवडय़ात निधन झाले. ‘कभी कभी’, ‘नूरी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांशी त्यांचे नाव जोडले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बाजार’ या चित्रपटाला क्लासेस आणि मासेस दोघांनी चांगली दाद दिली, पण त्यांच्यातील कलावंत हा कायम अस्वस्थ होता. फाळणीच्या दुःखाचा ओरखडा त्यांना आयुष्यभर सलत होता. इथल्या सामान्यांची भूक, दारिद्रय़, शोषण त्यांना अस्वस्थ करत होते. व्यवहारी हिशेबी दुनियेत कमर्शियल प्रेमपट लिहिताना त्यांच्यातील सच्चा लेखक त्यांच्याशीच बंड करत होता!

सागर सरहदी कायम अस्वस्थ होते.. त्यांचे मन आतून अशांत होते… फाळणीचा त्यांच्या भावविश्वावर उमटलेला ओरखडा आयुष्यभर नासूर होऊन त्यांना छळत होता. त्यांना कायम असं वाटायचं की आपल्याला मूळ गावातून बेदखल करून परक्या ठिकाणी जायला भाग पाडलं गेले. शरणार्थी जीवन वाटय़ाला आलं! Sense of belonging हा प्रश्न त्यांचासाठी महत्त्वाचा होता. फाळणीच्या दुःखानं त्यांचं उभं आयुष्य व्यापून गेलं होतं. ते दुःख, त्या वेदना, ती वंचना, ते अपमान… ते कधीच विसरले नाहीत. त्यांच्या मनातील ही खंत कायम त्यांना अस्वस्थ करत होती. पाकिस्तानातील अबोटाबादजवळील बफा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला 11 मार्च 1933 रोजी. गंगासागर तलवार हे त्यांचे मूळ नाव. सारं कसं सुरळीत चाललं होतं…. पण वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी देशाचे विभाजन झाले आणि एक ‘सियासी लकीर’ फाळणीच्या रूपाने अंतकरण उद्ध्वस्त करून गेली.

तलवार कुटुंबीय जीव मुठीत घेऊन तिथून अक्षरशः परागंदा होऊन श्रीनगर मार्गे दिल्लीला आले आणि तिथे मोडक्या तंबूमध्ये शरणार्थीचे जीवन जगू लागले! माणसाचं जगणं मुळापासून उपटून टाकणारी कोणती शक्ती असते हा प्रश्न त्यांना कायम सलत होता! यातूनच त्यांची विचारधारा घडत गेली. ते डाव्या विचारसरणीकडे वळाले. पुढे मुंबईला आल्यानंतर आधी खालसा आणि नंतर झेवियर कॉलेजमध्ये त्यांनी बीएची पदवी घेतली. इंग्रजी साहित्य त्यांचा आवडीचा विषय होता. पुस्तकांवर त्यांचं प्रेम तिथेच जडलं. यातून त्यांच्यातील लेखक नकळतपणे घडत गेला. सोबतीला प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन आणि इप्टामध्ये विचारवंतांची मैफल जमून लागली. या मैफलीत पैफी आझमी s, साहीर लुधियानवी, इस्मत चुगताइ, जां निसार अख्तर, मजरूह सुलतानपुरी होते! या सर्वांच्या विचारांच्या आदान प्रदानातून यांच्यातील लेखकाची जडणघडण सुरू झाली. त्या काळाचे नामवंत दिग्दर्शक झिया सरहदी (‘बैजू बावरा’, ‘फुटपाथ’चे संवाद लेखक) त्यांचे आवडीचे लेखक होते. स्वतःच्या नावातील ‘सागर’ आणि झिया सरहदी यांच्या नावातील ‘सरहदी’ घेऊन ते ‘सागर सरहदी’ या नावाने लिहू लागले. त्यांच्या मनातील खदखद, अस्वस्थता त्यांच्या लेखणीतून बाहेर पडू लागली. पुढे त्यांनी एका जाहिरात एजन्सीमध्ये नोकरी पत्करली. त्यांच्यातील अस्वस्थता मग साम्यवादी विचारांच्या नाटकांमधून बाहेर पडून राहिली . त्यांनी अनेक नाटपं लिहिली, अनेक उर्दू कथा लिहिल्या. हळूहळू त्यांच्यातील लेखक घडू लागला. त्यांच्या लिखाणातून कायम इथल्या शोषित समाजातील अन्यायाचा विचार प्रकट होत होता. जाहिरात एजन्सीमधून बाहेर पडून ते सिने-नाटय़ क्षेत्रात आले. बासू भट्टाचार्य यांच्यासोबत त्यांनी ‘अनुभव ‘ चित्रपटाकरीता संवाद लेखन केले.

ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याकडे त्यांचा पुतण्या रमेश तलवार दिग्दर्शनाचे धडे घेत होता. एकदा यश चोप्रा यांना घेऊन तो सागर सरहदी यांच्या नाटकाला घेऊन आला . नाटकातील बौद्धिक आणि साहित्य पूर्ण संवाद ऐकून यश चोप्रा खूप भारावले त्यांनी लगेच त्यांना आपल्या सोबत घेतले आणि इथून सागर सरहदी यांचा चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. 1976 साली ‘कभी कभी’ या चित्रपटापासून सागर सरहदी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहू लागले. ‘कभी कभी’ हा चित्रपट हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरला.साहीर लुधियानवी यांच्या काव्याचा आणि खय्याम यांच्या संगीताचा परमोच्च बिंदू गाठला गेला. या चित्रपटातील पटकथा आणि संवाद सागर सरहदी यांचे होते. या चित्रपटाचे फायनान्सर एकदा म्हणाले, या चित्रपटातील भाषा खूपच पुस्तकी वाटते चोप्रांनी सागर सरहदी यांना ही शंका बोलून दाखवली. पण सागर यांचा आपल्या लेखनावर विश्वास होता आणि झालेही तसेच.

या चित्रपटाने सुवर्ण महोत्सवी यश मिळवले. सरहदी यांच्या आयुष्याला प्रथमच अशी कलाटणी मिळाली. 20-22 चित्रपट निर्माते त्यांच्याकडे आले. पण मोजक्याच चित्रपटाच्या कथा-संवाद त्यांनी लिहिले. त्यांच्या पटकथा बंदिस्त असायच्या. यश चोप्रांसोबत त्यांची चांगली जोडी जमली. ‘नूरी’, ‘दुसरा आदमी’, ‘सिलसिला’, ‘फासले’, ‘चांदनी…’. गंमत बघा सागर यांच्या मूळ विचारसरणीला छेद देणारे यश चोप्रा यांचे हे कमर्शियल प्रेमपट होते. सागर यांना ही ‘जाणीव’ अस्वस्थ करून जायची. पण व्यवहारी दुनियेचे हिशेब वेगळे असतात.

पण त्यांना एकमेव संधी मिळाली. ‘बाजार’ या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन सबकुछ सागर सरहदी यांचे होते. मुस्लिम मुलींच्या समस्येला हात घालणारा हा सिनेमा त्यांनी अगदी अप्रतिम रीतीने बनवला होता. हिंदुस्थानातील गरीब मुस्लिम मुलींचा सौदा करून गल्फमध्ये त्यांना पाठवले जाते. अशी बातमी त्यांनी वर्तमानपत्रात वाचली होती त्यावरून त्यांनी हा चित्रपट बनवला. यातील हैदराबादी वातावरण, नायक- नायिकांचे परस्परांशी बोलणे, ती तहजीब आणि एकूणच सिनेमाचा बाज जबरदस्त होता. मीर तकी मीर, मखदूम मोईनुद्दीन, बशर नवाज , मिर्जा शौक या विभिन्न कालखंडातील शायरांच्या शायरील सिनेमात आणलं. करोगे याद तो हर बात याद आयेगी, दिखाई दिये यूं, देख लो आज हमको. फिर छिडी रात बात फुलोंकी… या गाण्यांनी सिनेमाचं भावविश्व आणखी गहिरं झालं. सागर सरहदी यांनी आयुष्यात (प्रदर्शित झालेला) हा एकच चित्रपट दिग्दर्शित केला, पण लाखमोलाचं काम करून गेला. या सिनेमाला क्लासेस आणि मासेस दोन्हीकडून चांगली दाद मिळाली. पारितोषिके मिळाली. कलासक्त व्यक्तीला व्यवहारी जगाचे कायदे समाजात नाहीत. त्याला तडजोड करावीच लागते. ‘बाजार’चा सिक्वेल काढायचा त्यांच्या खूप मनात होते, पण जमले नाही. नावाजुद्दीन सिद्दिकी, अमृता सुभाष यांना घेऊन त्यांनी ‘चौसर’ हा चित्रपट बनवला होता, पण वितरक त्याला हात लावायला तयार नव्हते. सच्च्या कलावंताची शोकांतिका ही अशी असते.

सागर सरहदी यांनी शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांच्या सुरुवातीच्या चित्रपटाची पटकथा संवाद लिहिले. (दिवाना, कहो ना प्यार है) आणि दोघांची कला कारकीर्द बहरली. सागर हे सर्व करत होते, पण त्यांच्यातील अंतस्थ कलावंत त्यांच्या उर्दू नाटकावर (राजा दरबार) सिनेमा काढण्यावर आतुर होता. ‘बाजार’चा पुढचा भाग त्यांना काढायचा होता. कायम पुस्तकाच्या दुनियेत रमलेल्या सागर सरहदी यांना तंत्रज्ञानाच्या आक्रमणाने सर्जनशीलता हरवत चाललीय अशी खंत कायमची वाटायची. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि एका सच्च्या कलावंताची तगमग थांबली!

[email protected]