
गेल्या आठवडय़ात झालेल्या दमदार पावसानंतर गेले तीन दिवस शहरात धुके पडत आहे. शनिवारी पहाटे सर्वत्र दाट धुक्याची चादरच पसरली होती. समोरील पंधरा-वीस फुटांवरील वाहने दिसत नव्हती. सकाळी साडेसहा वाजता वाहनाचे दिवे लावून प्रवास करावा लागत होता. धुक्यामुळे खरिपातील पिकाच्या काढणीत तसेच रब्बीच्या पेरणीमध्ये अडथळे येत आहेत. द्राक्षबागांच्या पोंगा आणि फुलोऱयातील बागा वाचवण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे. आणखी काही दिवस धुके राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा सुरूच आह़े दिवसा कडक ऊन, रात्री दव, पहाटे धुके या चक्रातून मार्गक्रमण सुरू आहे. सांगलीसह परिसरात गेले तीन दिवस धुके पडत आहे. शनिवारी पहाटे सर्वाधिक काळ धुके पडले. गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसानंतर गेले दोन दिवस प्रचंड उकाडा वाढला असून, ‘ऑक्टोबर हीट’ जाणवू लागला आहे. यामुळे द्राक्ष बागांवर दावण्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे. पोंगा व फुलोऱयातील बागांना सर्वाधिक धोका जाणवत आहे. द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. गेले तीन दिवस रब्बीतील शाळू पेरणी सुरू असून, धुक्यामुळे जमीन टणक बनू लागली आहे. परिणामी पेरणी झालेल्या पिकांसाठी पावसाची आवश्यकता आहे. मात्र, पावसाने जिह्याकडे पाठ फिरवली आहे.
































































