सातारा झेडपी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आचारसंहिता, हयगय केल्यास शिस्तभंगाची कारवाई – ज्ञानेश्वर खिलारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्हा परिषदेमधील कामांना गती व सुसूत्रता येण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी खातेप्रमुख, सर्व कार्यालयप्रमुखांसह कर्मचाऱयांना आचारसंहिता लागू केली आहे. कार्यालयीन उपस्थिती व कामकाजाबाबत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, यात हयगय केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी सर्व विभागांतील हजेरीपत्रकांची अचानक तपासणी केली. यामध्ये बहुतेक कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱयांनी कार्यालयीन वेळेपूर्वी म्हणजेच विहित वेळेत कार्यालयामध्ये उपस्थित राहून हजेरी पत्रकावर सही करणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱयांनी बायोमॅट्रिक प्रणालीवर नियमित पंचिंग करणे आवश्यक आहे. त्यावर आधारीतच वेतन देयके तयार करावीत. अधिकारी व कर्मचाऱयांनी प्रत्येक आठवडय़ातील सोमवार व गुरुवारी कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मंगळवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी फिरतीवर जातेवेळी फिरत्या नोंदवहीवर फिरतीच्या ठिकाणाची नोंद करणे आवश्यक आहे. यामध्ये हलगर्जीपणा, टाळाटाळ करणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार फिरती कारवाई करणे गरजेचे असल्यास जिल्हा परिषद स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱयांची परवानगी घेऊन फिरतीस जावे.

वर्ग 4 कर्मचाऱयांनी नियमित गणवेश वापरणे आवश्यक असून, गणवेश न वापरल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक सोमवारी होणाऱया आढावा बैठकीस खातेप्रमुखांनी अद्ययावत महितीसह वेळेत उपस्थित राहावे. संबंधित विभागांनी अद्ययावत टिपण्या सामान्य प्रशासन विभागाकडे दर शुक्रवारी सादर कराव्यात. सर्व विभागप्रमुखांनी परिपूर्ण अहवाल सादर करणे आवश्यक आहे. अहवालात टाळाटाळ झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुख व कार्यालयप्रमुखांसह कर्मचाऱयांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यामध्ये हलगर्जीपणा, टाळाटाळ करणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी सांगितले.