
अलिबाग-रेवस मार्गावरील सारळ खाडीवर असलेल्या पुलाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. या खाडीवर नवा पूल उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याने केल्यानंतरही सरकारने या प्रस्तावाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. डळमळीत झालेल्या या पुलावरून अवजड वाहनांना बंदी केली असतानाही त्याकडे कानाडोळा करून वाहतूक सुरूच असल्याने कोणत्याही क्षणी महाडच्या सावित्री नदीवर झालेल्या दुर्घटनेसारखी भयंकर घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अलिबाग-रेवस मार्गावरील समुद्रकिनारी सारळ खाडीवर १९८० मध्ये दगडी पुलाचे बांधकाम करण्यात आले. ४६ वर्षे हा पूल लाटांचा मारा सहन करत उभा आहे. सध्या या पुलाची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. येथे नवा पूल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने सरकारकडे पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. मात्र हा प्रस्ताव लालफितीत धूळ खात पडला आहे. नव्या पुलासाठी निधी मिळत नसल्याने किमान या पुलाच्या दुरुस्तीसाठी तरी ६० लाख रुपये मंजूर करावेत, असा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला. मात्र या प्रस्तावाकडेही सरकारने सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सारळ खाडीपूल कधीही कोसळेल, अशी परिस्थिती उद्भवली आहे.
बंदीचे फलक नावापुरतेच
सारळ पूल धोकादायक झाल्याने या पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आल्याचे फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावले आहेत. मात्र अवजड वाहतूक बंद करताना कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने रेवस बाजूकडील पाच गावांमध्ये जाणारी अवजड वाहतूक याच पलावरून सरू आहे.
हा पूल अवजड वाहतुकीस सक्षम नसल्याचे दिसून आले. येथे नवीन पूल उभारण्यासाठी ५ कोटी रुपये निधीची आवश्यकता असून निधी उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नसून पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी ६० लाख रुपये निधी मिळावा, असा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला आहे.
कृतिक घोडेस्वार
कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग


























































