मुलीवर अत्याचार करणारा मामेभाऊ गजाआड; राहुरी पोलिसांची कामगिरी

अल्पवयीन मुलीचे व्हिडीओ शूटिंग तसेच गावठी कट्टय़ाचा धाक दाखवून तब्बल 8 वर्षांपासून अत्याचार करणाऱया मामेभावास राहुरी पोलिसांनी नगर जिह्यातील जामखेड येथून ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. या आरोपीला राहुरी न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे 8 वर्षांपूर्वी अपहरण झाले होते. 2016 ते एप्रिल 2024 या कालावधीत मुलीचा सख्खा मामेभाऊ ऋषिकेश पांडुरंग धोंडे (वय 25) व तिचा सख्खा मावसभाऊ सतीश टकले या दोघांनी मिळून पीडित मुलीचे मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग काढून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल तसेच गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून अत्याचार केले.

मामेभाऊ ऋषिकेश धोंडे याने आळंदी येथे जाऊन तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. तसेच पीडित मुलीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या गुह्यातील ऋषिकेश धोंडे हा बीड जिह्यात असल्याची खबर मिळताच, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक खोंडे, सहायक फौजदार भराटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, हेड कॉन्स्टेबल पालवे, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, नदीम शेख, इफ्तेखार सय्यद, अंकुश भोसले, सतीश कुराडे, गोवर्धन कदम, अशोक शिंदे, सचिन धानंद यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

या घटनेतील दुसरा आरोपी व पीडित मुलीचा सख्खा मावसभाऊ टकले हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दोघांवर बलात्कार, पोस्को कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चारूदत्त खोंडे
करीत आहेत.