
मुंबईला पाणीपुरवठा करणारी भातसा, तानसा, वैतरणा ही धरणे शहापूर तालुक्यात असतानाही येथील आदिवासींच्या नशिबी मात्र गेल्या काही वर्षापासून पाणीटंचाईच आहे. सरकारच्या अनेक योजना आणि गेल्या, पण काही दूर झाले नाही. यंदा तर जून महिना अर्धा संपत आला तरी माता-भगिनींची पायपीट सुरू आहे. कसारा, किन्हवली, डोळखांब, टाकी पठार, कसारा खुर्द, खर्डी या भागांतील विहिरी आटल्या आहेत. घोटभर पाण्यासाठी आदिवासी या विहिरींना अक्षरशः ‘घेराव’ घालत असून टँकर येताच हंडे, कळशा घेऊन गावकऱ्यांची झुंबड उडत आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात उन्हाचे चटके बसत असून पाणी आणण्यासाठी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच दोन ते चार किमी दूरवर जावे लागते. २००८ पासून नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या. पण शहापूरकरांच्या नळाला पाण्याचा टिपूसही आलेला नाही. भीषण पाणीटंचाई असूनही शहरी भागात मात्र विकासकांच्या प्रकल्पांसाठी रोज अंदाजे तीन ते चार लाख लिटरचे पाणी चोरले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
शहापूर तालुक्यात सध्या वाड्या-वस्त्यांपर्यंत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पण डोंगराळ भागात हे टँकर पोहोचू शकत नसल्याने आदिवासींना विहिरी व डबक्यांशिवाय दुसरा मार्गच नाही.
शहापूरच्या दुर्गम भागातील विहिरींजवळ रोज हंडे, कळशा, बादल्या व अन्य मिळेल ती सामग्री घेऊन महिला पाण्यासाठी विहिरीजवळ गर्दी करतात. काही विहिरी तर घसरड्या झाल्या असल्याने दुर्घटना घडण्याची भीती आहे.





























































