
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या शाळांमध्ये सुरू केलेल्या सीबीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत भरघोस यश संपादन केले असून दादर पश्चिम येथील मुंबई पब्लिक स्कूल सीबीएसई दहावीचा निकालही 100 टक्के लागला आहे. दहावीतील या गुणवंतांचा शिवसेनेकडून सत्कार करण्यात आला.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न 11 शाळांच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या शाळांचा एकूण निकाल 92.89 टक्के इतका लागला असून चार शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये दादरच्या भवानी शंकर रोडजवळील मुंबई पब्लिक स्कूलमधील 34 पैकी 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यश वळंजू या विद्यार्थ्याने 94.6 टक्के गुण मिळवले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासोबत नगरसेवक व शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, नगरसेविका माधुरी मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांसह प्रशासकीय अधिकारी स्नेहलता डुंबरे, मुख्याध्यापक दीपक वेखंडे तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख सिद्धार्थ चव्हाण, शिवसेना शाखा क्र. 192 चे शाखाप्रमुख प्रवीण नरे, शाखा समन्वयक रविकांत पडयाची, महिला शाखा समन्वयक कल्पना पालेकर, माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, युवा अधिकारी सुशांत गोजारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.




























































