
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आवाज बुलंद करणारे आणि मनमनात अंगार फुलवणारे मशाल गीत संगीतबद्ध झाले असून या गीताचा नादघोष आता अवघ्या महाराष्ट्रात घुमणार आहे. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आज संगीतकार राहुल रानडे यांनी हे गीत सुपूर्द केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘मशाल’ ही निवडणूक निशाणी दिली आहे. ही निशाणी क्षणार्धात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली असून हाती धगधगती मशाल घेऊन एकनिष्ठ शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनता पुढच्या लढाईसाठी सज्ज झाली आहे. या लढाईत अंगार फुलवण्याचे काम आता मशाल गीत करणार आहे.
शंखनाद होऊ दे, रणदुदुंभी वाजू दे
नादघोष गर्जू दे विशाल
दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या
धगधगती पेटू दे मशाल ।।
असा ‘शंखनाद’ मशाल गीतातून होणार असून प्रसिद्ध गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी हे गीत लिहिले आहे. विवेक नाईक यांनी आपल्या पहाडी आवाजात हे गीत गायले असून प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी या गीताला संगीतसाज चढवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आज हे गीत सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते.
वारे पलटतील, फासे पलटतील…
मशाल हे क्रांतीचे प्रतीक मानले जाते आणि या निशाणीला साजेसेच असे गीत रचले गेले आहे. दुष्ट शक्ती जाळण्यासोबतच शत्रूवर तुटून पडण्याचा संदेश मशाल गीतातून देण्यात आला आहे. ‘वारे पलटतील, फासे पलटतील’ असा विश्वास देताना शिवसैनिकांना लढत राहण्याचे बळही हे गीत देणार आहे. हिंदुत्वाचा हुंकार भरतानाच सारे काही मंगल होण्यासाठी विशाल दृष्टी ठेवण्याची सादही या गीतातून घातली गेली आहे. गीतातील ‘जय भवानी… जय शिवाजी’ असा जयघोष स्फुरण भरणारच आहे.

































































