…तर यांच्या पेकाटात लाथ घाला, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी धारावी येथील शिवसेनेच्या शाखेला भेट द्यायला गेले होते. यावेळी त्यांनी तेथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या दरम्यान भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ”जर यांना जनता कुत्र्यामांजरासारखी वाटत असेल तर निवडणूकीच्या वेळी जेव्हा हे मत मागायला येतील तेव्हा यांच्या पेकाटात लाथ घाला असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”सध्या मी शाखा शाखांना भेटी द्यायचं ठरवलं आहे. पण या भेटींच्या प्रत्येक ठिकाणी अशा सभाच होत आहेत. शाखा भेटींच्या वेळी एवढी गर्दी होतेय की शाखाच दिसत नाही. जिथे जातोय तिथे लोकांच्या झुंडीच्या झुडी येतायत. संपूर्ण महाराष्ट्रात हेच सुरू आहे. हे सर्व या सरकारच्या विरोधातील असंतोष आहे. सरकार विरोधात सर्वात जास्त असंतोष धारावीत आहे. या सरकारचा विरोध करणाऱ्यांच्या मागे हे सरकार सर्व यंत्रणा आहे लावत आहेत. ईडी सीबीआय आता तर काय निवृत्त पोलीस अधिकारी देखील. लोकांच्या मागे या यंत्रणा लावायच्या व त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं. पण विकाऊ माल विकला गेला हरकत नाही. मात्र निष्ठावंत मावळे सोबत आहेत तोपर्यंत मला लढण्याची चिंता नाही. कारण मला विश्वास आहे की आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच”, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी मिठागराच्या जागेवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. याआधी मी मोर्चा काढला तेव्हाच सांगितलं होतं की धारावीकरांना मिठागराजवळ ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये टाकतील. तेव्हा निर्णय झालेला नव्हता. तेव्हा सरकारमधले काही लोकं म्हणाले होते की उद्धव ठाकरे काहीही म्हणत आहेत. काही दिवसांपूर्वी आता तोच निर्णय झाला. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून मुंबईकरांसाठी कांजूरची मिठागराची जागा मागत होतो. तेव्हा मला दिली नाही. केंद्र म्हणाले की ही आमची जागा आहे. मात्र पंतप्रधानांच्या मित्राला अडाणीला मुलुंडच्या मिठागराची जागा लगेच दिली. ही तुमची सबका साथ सबका विकासची परिभाषा आहे का. साथ सबका हवा मात्र विकास फक्त आपल्या मित्राचा करणार. मी असं होऊ देणार नाही. माझे धारावीकर इथून कुठे जाणार नाही. एकदा का तुम्ही मिठागारात गेलात तर तुम्हला पुन्हा धारावी दिसणार नाही. आणि तुमची धारावी ही खुद्द अडाणीच्या घशात घालणार. मिठागरच्या इथे जाऊन बघून या. तिथे कशा सोयी देणार. किती वर्ष तुम्ही तिथे राहणार. काहीच स्पष्ट नाही. त्यामुळे इथून कुठेच जाऊ नका. माझ्या धारावीकराला इथेच 500 फूटाचं घर मिळालंच पाहिजे. तुम्ही इकडे कोंदवाडा करायचा आणि या लोकांना उचलून मिठागारात फेकायचं आणि इकडचा सगळा पैसा अडाणीच्या खिशात घालायचा. माझ्या धारावीकरांनी काय पाप केलंय. आता या धारावीला सोन्याची किंमत आलीय. धारावीच्या विकासासोबत अख्खी मुंबई विकायला काढली आहे यांनी”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”नुकतंच मी वाचलं की वांद्रे रेक्लेमेशनसाीठी देखील टेंडर काढले आहे. तीन लोकांनी टेंडर भरले आहेत. ते देखील टेंडर अडाणीला मिळणार हे लिहून घ्या, आपलीच लोकं घुसवायची आणि बरोबर अडाणीला टेंडर द्यायचं. सगळ्या गोष्टी अडाणीला कशा मिळणार. मुंबई भिकेला लावायची. महाराष्ट्र बदनाम करून टाकले आहे यांनी. रोज हत्या होतायत गुन्हे वाढले आहेत. अशाने बाहेरचे उद्योगधंदे येणार नाहीत. मुंबईतल्या लोकांची पार वाट लावायची आहे यांना हे बघून जीव जळतोय म्हणून मी लढाईला उभा आहे. मला साटंलोटं करायचं असतं तर मी करून मोकळा झालो असतो. तुम्हाला कळलं पण नसतं. पण मी गरिबांसोबत उभा राहिलो. ही माझी ताकद आहे. व त्याच्यासाठी मी लढतोय. आपला जीवन बर्बाद करून काहीही करणार नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी एका भाजप आमदाराने भर स्टेशनमध्ये गोळीबार केला. आमचा एक युवा कार्यकर्ता अभिषेक घोसाळकर याची हत्या झाली. जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची हत्या झाली. नागपूरमध्ये हत्या झाल्या आहेत. एवढ्या हत्या होतायत. राज्याला गृहमंत्री आहेत की नाही. हे सगळं होताना त्यांचा राजीनामा मागितल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत बेशरमपणे म्हणतात. एखादं कुत्रं जर गाडीखाली आलं तरी विरोधक गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील. आम्ही आमचा कार्यकर्ता मारला गेला म्हणून आवाज उठवला. तुमच्या लेखी जर ही जनता कुत्र्या मांजरासारखी असेल तर निवडणूकीच्या वेळी आल्यानंतर तुम्हाला त्यांच्या पेकाटात लाथ घालावीच लागेल. तुमची शक्ती काय आहे हे तुम्ही आता दाखवली नाही तर मग आओ जाओ घर तुम्हारा है अशी परिस्थिती होईल. तुम्हाला दिल्लीत तुमच्या हक्काचा आवाज उठवणारा खासदारा हवा की दिल्लीत त्यांच्या खुर्ची खाली जाऊन त्यांचे तळवे चाटणारा खासदरा हवा आहे. य़ा लढाईत मी पुढे आलेलो आहे. साथ खरोखर राहणार आहात की नाही. तुम्ही जागा विकणार नाही तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य विकणार आहात, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांना केले आहे.