
संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत. हेही दिवस जातील. पुन्हा मैदानात उतरू व पक्ष नव्याने बांधू.
शिवसेना संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. ही फूट बंडखोरांनी पाडली नाही तर ती भाजपने पाडली आहे. पण तुम्ही आमच्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा; पण ते बाण चालविण्यासाठी धनुष्य तर लागेल ना? ते धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला दिला.
उत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप दोन कोंबडय़ांमध्ये झुंज लावत आहे. एक मेला की दुसऱयाला जेलमध्ये टाकायचं, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. अशा पद्धतीने भाजपला शिवसेना संपवायची आहे. पण तुम्ही सतर्क राहा.
संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत
आम्ही ठाकरे आहोत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे. संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत. हेही दिवस जातील. पुन्हा मैदानात उतरू व पक्ष नव्याने बांधू. शिवसेना पुन्हा उभी करू, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी केला.
आम्ही शिवसेनेसोबतच
उत्तर भारतीय एकता मंचच्या मुंबईतील पदाधिकाऱयांनी आज शिवसेना भवन येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मागील 32 वर्षे आम्ही शिवसेनेसोबत आहोत. या संकटाच्या काळात आम्ही ठामपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, अशी ग्वाही एकता मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या वेळी दिली. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना प्रतोद सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर, सुनील शिंदे, एकता मंचचे पदाधिकारी अशोक तिवारी, ठाकूर, दिनेश शुक्ला, एस.आर. यादव, प्रेम विश्वकर्मा, डॉ. संतोष पांडे, फाल्गुनी ब्रह्मभट्ट, इंदिरा अग्रवाल, बिंदू दुबे आदी उपस्थित होते.

































































