श्री तुळजाभवानीचा सोन्याचा प्राचीन मुकुट गायब? तपासणी समितीच्या अहवालातून धक्कादायक बाबी उघड

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीचा प्राचीन मुकुट गायब असून त्या जागी दुसरा मुकुट ठेवण्यात आला आहे. तसेच देवीच्या नित्योपचारासाठीच वापरण्यात येणारे सोन्या-चांदीचे दागिने, हिरे, मोती, माणिक, पाचू असे अनेक अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या तपासणी समितीच्या अहवालातून समोर आली आहे. श्री तुळजाभवानी मंदिरातील प्राचीन दागदागिन्यांची तपासणी करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दोन महिन्यांपूर्वी अहवाल सादर केला आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदी आणि प्राचीन अलंकारांची तपासणी करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन केली होती. उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने मंदिर प्रशासनातील अधिकारी, पुजारी मंडळाचे प्रतिनिधी आणि महंतांचा सहभाग होता. या समितीने सादर केलेल्या अहवालातून तुळजाभवानी मंदिरातून वेगवेगळ्या सात डब्यांमधील शेकडो वर्षांचा इतिहास असलेले अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान दागदागिने गायब असल्याचे समोर आले आहे.

तुळजाभवानी देवीचे मौल्यवान दुर्मिळ दागिने एकूण सात डब्यांत ठेवण्यात आले आहेत. या दागिने 300 वर्षांपासून ते 900 वर्षांचे जुने आहे. डबा क्रमांक 1 हा विशेषप्रसंगी वापरला जातो. शारदीय व शाकंभरी नवरात्रोत्सव, संक्रांत, रथसप्तमी, गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया व शिवजयंती अशा महत्त्वाच्या दिवशी या डब्यांतील दागदागिन्यांचा साज तुळजाभवानी देवीला केला जातो. या डब्यात एकूण 27 प्राचीन अलंकार आहेत. त्यापैकी चार अलंकार गायब असल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे. शिवाय अनेक अलंकारांच्या वजनात कमालीची तफावत नोंदविण्यात आली आहे.

डबा क्रमांक 6 मधील अलंकार नित्योपचारासाठी वापरले जातात. 1976 पर्यंत डबा क्रमांक 3 मधील अलंकार नित्योपचार पूजेसाठी वापरले जात होते. मात्र, दागिन्यांची सतत दुरुस्ती करावी लागत असल्याने डबा क्रमांक 3 बंद करून डबा क्रमांक 6 हा 1976 पासून नित्योपचारासाठी वापरला जात आहे. त्यातील साखळीसह 12 पदरांच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र व चांदीचा खडाव हे अलंकार गहाळ झाले आहेत.

1976 पर्यंत नित्योपचारासाठी वापरण्यात आलेल्या डबा क्रमांक 3 मध्ये 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मूळ मुकुट गहाळ असल्याचा संशय समितीने व्यक्त केला आहे. तुळजाभवानी देवीच्या जुन्या फोटोंमध्ये असलेला मुकुट आणि डबा क्रमांक 3 मध्ये सध्या आढळून आलेला मुकुट यात फरक आहे. त्यामुळे तुळजाभवानी देवीचा सोन्याचा प्राचीन मुकुट बदलून त्या ठिकाणी दुसरा मुकुट ठेवल्याची नोंद समितीने त्यांच्या अहवालात केली आहे. त्याचबरोबर या डब्यातील एकूण 16 अलंकारांपैकी मंगळसूत्र, नेत्रजडावी, माणिक-मोती हे तीन दुर्मिळ आणि मौल्यवान अलंकार गहाळ झाले आहेत.

एक किलो 268 ग्रॅम वजनाची 289 सोन्यांच्या पुतळ्यांची तीन पदरी शिवकालीन माळ तत्काळ दुरुस्त करण्याची शिफारस समितीने केली आहे. डबा क्रमांक 5 मधील एकूण 10 अलंकारांपैकी एक अलंकार गायब तर अन्य अलंकारांच्या वजनात तफावत असल्याचे नोंदविण्यात आले आहे. डबा क्रमांक 7 मधील एकूण 32 दुर्मिळ अलंकारांपैकी तुळजाभवानी देवीचा चांदीचा पुरातन मुकुट गायब असल्याचे आढळून आले आहे तर अन्य 31 अलंकारांच्या वजनातही लक्षवेधी तफावत असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.

दागिने तपासणी समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये अनेक अनागोंदी असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात दोषी कोण, हे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करत आहे. अहवालातील माहितीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घ्यायची का, यावर निर्णय घेतला जाईल.
– डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी, धाराशिव

या प्रकरणी 2001 पासून याविषयी सातत्याने मुख्यमंत्री, विधि व न्याय विभाग, धर्मादाय आयुक्त, विभागीय आयुक्त यांच्याकडे सातत्याने तक्रारी दाखल करून पाठपुरावा केला जात आहे. तुळजाभवानी देवीच्या पुरातन दागिन्यांची माहिती नसणाऱ्या सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीच्या अहवालात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
– किशोर गंगणे, माजी अध्यक्ष, पुजारी मंडळ तुळजापूर