मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत; एकाच वर्षात दीड लाख जणांना चाव, शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी उठवला आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात असले, तरी मुंबईत अजूनही भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. २०२५ या एकाच वर्षात तब्बल १ लाख ५४ हजार १७ जणांचा कुत्र्यांनी ताबा घेतला असून (लचके तोडले) त्यांना चावा घेतल्याची बाब समोर आली आहे. अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी महासभेत ही आकडेवारी सादर केली. मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत शिवसेना नगरसेवक कैलासनाथ पाठक यांनी ६६-ब अंतर्गत आज हा मुद्दा उपस्थित केला होता.

मुंबईत भटक्या व बेवारस कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे कैलासनाथ पाठक यांनी निदर्शनास आणून दिले. यावर, पालिकेच्या रुग्णालयांत रेबीजप्रतिबंधक लस वेळेत मिळत नसल्याचा मुद्दा इतर नगरसेवकांनी मांडला. सभागृहात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, सचिन पडवळ, शिवानी परब, सभागृह नेते गणेश खणकर, डॉ. सईदा खान, अजंता यादव, तृष्णा विश्वासराव, प्रकाश दरेकर, संध्या दोशी, प्रीती सातम, आशा मराठे आणि नितेश सिंह आदी सदस्यांनी मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत प्रश्न उपस्थित केले.

सहा ठिकाणी नवीन निवारा केंद्रे; २०३० पर्यंत रेबीजमुक्तीचे ध्येय

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा, क्रीडा संकुले, बस डेपो आणि रेल्वे स्थानकांनावरील कुत्र्यांना कायमस्वरूपी निवारा क्षेत्रात सोडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी मालवणी, मुलुंड, आणिक, ऐरोली आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर अशा सहा ठिकाणी नवीन शेल्टर होम (निवारा केंद्रे) सुरू करण्यात येतील. ‘नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर डॉग-मेडिएटेड रेबीज एलिमिनेशन’ अंतर्गत २०३० पर्यंत मुंबई शहर रेबीजमुक्त करण्याचा कार्यक्रम सुरू आहे.