कॅबिनेट बैठकीमुळे मंत्रालय परिसरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, ठेकेदारांपासून एजंट आणि मध्यस्थांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्री हमखास मंत्रालयात भेटतात. त्यामुळे ठेकेदारी मिळवण्यापासून बदलीची कामे आणि जमिनीच्या कामासाठी राज्याच्या ग्रामीण भागातून असंख्य कार्यकर्ते मोटारींचा ताफा घेऊन मंत्रालय परिसरात आज आले होते. मोटारींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मंत्रालय परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता.

राज्याचे मंत्री सध्या मंत्रालयापेक्षा शासकीय बंगल्यावरून कामकाज पाहतात. सध्या मंत्रालयातील दालनात काही मोजकेच मंत्री उपस्थित असतात. मंत्रिमंडळाची बैठक प्रामुख्याने मंगळवारी होते. या दिवशी बहुतांश मंत्री हमखास मंत्रालयात येतात. त्यामुळे विविध प्रकारची कामे घेऊन असंख्य कार्यकर्ते ग्रामीण भागातून मोटारींचा ताफा घेऊन मंत्रालयात येतात. आजच्या कॅबिनेटच्या दिवशीही कार्यकर्त्यांची अशीच गर्दी झाली होती.

मंत्रालयात कोणाची गर्दी

मंत्रालयात सध्या ठेकेदार, एजंट, दलाल आणि कुंभमेळ्यातील सुविधा आणि इतर खासगी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांच्या सूटबूट आणि फॉर्मल ड्रेसमधील तरुण-तरुणींची प्रामुख्याने गर्दी होते. बदलीची कामे घेऊन मंत्रालयात येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्याशिवाय हौशेनवशे कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबकबिला, बच्चे पंपनी मंत्रलयात येतात. मंत्रालयाच्या इमारतीमध्ये अनेकांचे ‘फोटोसेशन’ सुरू असते. मंत्रालयाच्या शेजारी अॅनेक्स दोन या इमारतीच्या बाहेर गाडय़ांचे पार्किंग होते. त्याशिवाय याच परिसरातील बेस्टच्या डेपोच्या जागेवर तर खासगी मोटारी खुलेआम उभ्या असतात.

‘पास’ नसलेली वाहनेही मंत्रालयात पार्क

हिरवा पास मंत्रालयात कार पार्किंगसाठी आणि लाल पास मंत्रालयात प्रवेश केल्यावर आतील व्हीआयपीला सोडून मोटार पुन्हा बाहेर नेणे बंधनकारक आहे. तरीही लाल पासच्या मोटारी मंत्रालयातच उभ्या केल्या जातात. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीमुळे पोलीस हतबल आहेत.

एअर इंडियाच्या इमारतीत 150 पार्किंग

राज्य सरकारने एअर इंडियाची इमारत विकत घेतली आहे. या इमारतीच्या दीडशे शासकीय वाहनांसाठी पार्किंगची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. पण तरीही अधिकारी वर्गाच्या शासकीय मोटारी मंत्रालयाच्या परिसरातच पार्क केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते.