Student Agitation – ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थी रस्त्यावर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनाकाळात ऑनलाइन वर्ग सुरू असताना दहावी, बारावीची परीक्षाही ऑनलाइन घ्या, असा हट्ट करत मुंबई, नागपूर, संभाजीनगर आणि धाराशीवमध्ये शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तर धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, विद्यार्थ्यांचे हे आंदोलन उत्स्फूर्त नव्हते, तर त्याचे प्लॅनिंग आधीच झाल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मुंबई, पुणे, नागपुरातील आंदोलनाची ठिकाणे आधीच ठरली होती. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन नको, ऑनलाइनच घ्या, या मागणीसाठी राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले. मुंबई, नागपूर, संभाजीनगर आणि धाराशीवमध्ये विद्यार्थ्यांसह काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. विद्यार्थ्यांनी नागपुरातील ट्रिलीयम मॉल मेडिकल चौकात आंदोलन केले. राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन होऊ शकतात. मग, दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षासुद्धा ऑनलाइन व्हायला हव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱयांना पत्राद्वारे केली. नागपूरमध्ये स्कूल बसची तोडफोड करण्यात आली. यावेळी आंदोलक विद्यार्थी आक्रमक झाल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांशी चर्चा करू

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दूर जावे लागू नये यासाठी ते शिकत असलेल्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही तज्ञांशी चर्चा करू. 10वी आणि 12वीच्या परीक्षा लवकर झाल्या तर विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

आंदोलनात विद्यार्थी नव्हतेच

काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे सगळय़ा विद्यार्थ्यांचे हेच मत आहे असे नाही. आंदोलनाच्या माध्यमातून काही चुकीचे लोकही घुसले. या सगळय़ाची चौकशी केली जाईल. परीक्षा कशी घ्यायची याचा सल्ला कोणीही द्यायची गरज नाही. तो निर्णय शिक्षण विभाग घेईल, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या भवितव्याशी खेळू नका

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका. महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करून मार्ग काढेल; विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

हिंदुस्थानी भाऊची चिथावणी

आंदोलक विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ याने चिथावणी दिल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हिंदुस्थानी भाऊचे मूळ नाव विकास पाठक आहे. मात्र, या भाऊला अचानक विद्यार्थ्यांचा पुळका का आला, याचे बोलवते धनी कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

शालेय विद्यार्थ्यांना आंदोलनात उतरवणाऱयांचा छडा लावणार

महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडे मांडायला हवी होती. शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. एवढय़ा मोठय़ा संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती आहे का? याचा तपास करायचे आदेश दिले असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.