T20 World Cup 2024 : हिंदुस्थानचा ‘हा’ ब्रँड करणार आयर्लंड आणि स्कॉटलंडला स्पॉन्सरशिप

आयपीएलचा (IPL 2024) धुरळा संपला की लगेच जुनमध्ये टी-20 विश्वचषकाची रणधुमाळी सुरू होणार आहे. क्रिकेटवेड्या चाहत्यांसाठी ही एक प्रकारे पर्वणीच आहे. विश्वचषकाचे आयोजन वेस्ट इंडीज आणि अमेरिका (USA) यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात येणार आहे. मात्र या विश्वचषकात कर्नाटकचा एक दुधाचा ब्रँड आयर्लंड आणि स्कॉटलंड या दोन संघांना स्पॉन्सरशिप देणार आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात हिंदुस्थानचे नाव झळकणार हे निश्चीत.

4 जुन पासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकच्या धरतीवर विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकात कर्नाटकातील सरकारी मालकीचा डेअरी ब्रॅड ‘नंदिनी’ जागतिक स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. कर्नाटक दुध महासंघाचा (KMF) डेअरी ब्रँड ‘नंदिनी’ आयर्लंड आणि स्कॉटलंड या दोन संघांना स्पॉन्सरशिप देणार आहे.

अमुल आणि नंदिनी हा वाद काही महिन्यांपूर्वी चांगलाच रंगला होता. तसेच कर्नाटक विधानसभांच्या दरम्यान नंदिनी ब्रँड चांगलाच चर्चेत होता. हाच ब्रँड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे. एका स्वदेशी ब्रँडने आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट संघांना स्पॉन्सरशिप करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

IPL 2024 – इम्पॅक्ट प्लेअरचे बारा वाजणार; रोहित, बुमराच्या टीकेनंतर बीसीसीआयचा पुनर्विचार

“आम्ही टी-20 विश्वचषक स्पर्धेत आयर्लंड आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांना स्पॉन्सरशिप देणार होतो. आमचा ब्रँड हा सामन्यांदरम्यान प्रदर्शित होणार आहे,” असे KMF चे व्यवस्थापकीय महासंचालक एम.के.जगदीश यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तसेच नंदिनी हा ब्रँड अमेरिकेच्या एनर्जी ड्रिंक मार्केटमध्ये ‘Nandini Splash’ या नावाने एंट्री करणार आहे, असे एम.के.जगदीश यांनी इंडीया टुडेशी बोलताना सांगितले.