
सामना प्रतिनिधी। नगर
येत्या लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी मतदान यंत्र विरोधी जनआंदोलनाचे जालिंदर चोभे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले.
ईव्हीएम मशीनमध्ये दोष आढळत असून, नव्याने जोडण्यात येत असलेल्या व्हीव्ही पॅट मशीन देखील दोषमुक्त झालेले नाही. निवडणूक आयोग नागरिकांच्या तक्रारी सोडून ईव्हीएम व व्हिव्ही पॅट मशील कसे निर्दोष असल्याचा प्रचार-प्रसार करीत आहे. उमेदवाराचा मत पडताळणीचा, रिकाऊंटिंगचा अधिकारच काढून घेतल्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार सोडून इतर उमेदवारांची मते इकडची-तिकडे सहज पळवली जाऊ शकणार असल्याचा आरोप चोभे यांनी केला आहे.
ईव्हीएम मशीन हॅक करता येत असल्याचे अमेरिकेतील विश्वविद्यापीठ तज्ञाने तसेच भारतीय इंजीनिअरांनी प्रात्यक्षिकासह सिध्द करुन दाखविले आहे. तरी देखील या विषयावर विरोधी पक्ष बोलण्यास तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करुन, यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.































































