आधी हार, मग दंडाचा मार; संथगतीने षटके टाकल्यामुळे हिंदुस्थानी संघावर दंडात्मक कारवाई

पहिल्याच टी-20 सामन्यात हिंदुस्थानी संघाला हार आणि नंतर दंडाचा मार एकाच वेळी बसला आहे. गुरुवारी वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात हिंदुस्थानी संघाने षटकांची गती न राखल्याने आयसीसीने दंड ठोठावला आहे. हिंदुस्थानी खेळाडूंना त्यांच्या सामनाच्या मानधनातील 5 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानला एकाच दिवशी दोन धक्के बसले.

एकदिवसीय मालिका 2-1 ने खिशात घातल्यानंतर टी-20 मालिकेत हिंदुस्थानी संघ एकतर्फी विजय मिळवेल अशी आशा हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त केली जात होती. मात्र पहिल्या सामन्यात खराब फलंदाजीमुळे हिंदुस्थानला 150 धावांच्या आव्हानाचाही पाठलाग यशस्वीपणे करता आला नाही. परिणामी हिंदुस्थानला पहिला सामना 4 धावांनी गमवावा लागला. पहिल्या विजयासह वेस्ट इंडीजने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. ब्रेंडन किंग, निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने 149 धावांपर्यंत मजल मारता आली. हिंदुस्थानच्या चहल व अर्शदीप यांनी प्रत्येकी 2, तर कुलदीप यादव व हार्दिक पंडय़ा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 150 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानची खराब सुरुवात झाली. ईशान किशन आणि शुभमन गिल स्वस्तात बाद झाले. त्यानंतर तिलक वर्माने 39 धावा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही संघांवर कारवाई

या सामन्यानंतर आयसीसीने दोन्ही संघांवर षटकांची गती न राखल्याने कारवाई केली. हिंदुस्थानबरोबर वेस्ट इंडीजच्या खेळाडूंवरदेखील आयसीसीने कारवाई केली. हिंदुस्थानच्या खेळाडूंना 5 टक्के तर, विंडीजच्या खेळाडूंना 10 टक्के रक्कम  दंड म्हणून भरावी लागणार आहे. खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचाऱयांसाठीच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या कायद्यानुसार खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या संघाने दिलेल्या वेळेत गोलंदाजी न केल्यास त्यांच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड आकारला जातो. विंडीजच्या पॉवेल आणि हिंदुस्थानच्या पंडय़ा या दोघांनीही गुन्हा कबूल केला आहे.