बृजभूषण यांचे तिकीट कापले; मुलाला निवडणूक रिंगणात उतरवण्याची भाजपवर नामुष्की

 महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण भाजप नेते बृजबूषण शरण सिंह यांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या आरोपांमुळे या वेळी त्यांचे  उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणुकीचे तिकीट कापण्यात आले असून त्यांचे पुत्र करण यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे.

कुस्तीपट्टू साक्षी मलिक, बजरंग पूनिया आणि विनेश फोगाट यांसारख्या कुस्तीपट्टूंनी बृजभूषण यांच्याविरोधात मोहीम सुरू केली होती. हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांनी महिला कुस्तीपट्टूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत महिला कुस्तीपट्टूंनी बृजभूषण यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. तसेच बजरंग पूनियासह अनेक कुस्तीपट्टंनी तर आपली पदकेही परत केली होती. अनेक दिवस कुस्तीपट्टूंनी धरणे आंदोलन छेडले होते. भाजपाने या प्रकरणी बृजभूषण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. परंतु त्यांना होत असलेला विरोध पाहता त्यांचे लोकसभा निवडणुकीचे तिकीट कापण्यात आल्याची चर्चा आहे.

रायबरेलीतून दिनेश प्रताप

उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपने केली. रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह आणि कैसरगंज येथून करण भूषण सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. करण भूषण सिंह हे उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील मोहनलालगंज, लखनू, रायबरेली, अमेठी, जालौन, झांशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज आणि गोंडा या मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे.