
मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. तस्करामध्ये एका महिलेचा समावेश असून त्यांच्याकडून तब्बल 11 लाख 20 हजारांचे 56 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा प्रदीप पाचंगे वय 44 रा,थेरगाव चौकीजवळ,पिंपरी चिंचवड आणि शरण बसवराज पाटील वय 43 अशी अटक केलेल्या तस्कराची नावे आहेत.
अमली पदार्थ विरोधी पथक दोन सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी नवले ब्रीज शेजारी दोघेजण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 11 लाख 20 हजारांचे मेफेड्रोन, मोटार, वजनी काटा असा 14 लाख 42 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, संतोष देशपांडे,योगेश मांढरे,चेतन गायकवाड ,प्रशांत बोमादांडी,दिनेश बास्तेवाड,साहिल शेख, अझीम शेख, युवराज कांबळे यांनी केली.
मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांची माहिती पथकाला मिळली होती. त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेत 11 लाखांवर मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असून खरेदीदारची माहिती काढण्यात येत आहे. – सुनील थोपटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक दोन































































