
भ्रष्टाचाराचे आरोप करीत उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार असा इशारा देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घूमजाव केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग आहे. तुरुंगात जाणे म्हणजेच कारवाई होणे. सर्वांना तुरुंगात टाकणे शक्य नाही, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज अक्षरशः यूटर्न घेतला.
पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार परिषदेत सोमय्या यांना तुम्ही म्हटले त्याप्रमाणे अजित पवार तुरुंगात जाणार का, असा सवाल करण्यात आला. तेव्हा सोमय्या यांनी आपल्या वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका असे सांगितले. बोलताना आपण तसे बोलत असतो. मात्र अजित पवार यांच्यावर कारवाई होणार असे मला म्हणायचे आहे. अशी कारवाई झाल्यावर तुम्ही माझे कोतुक तरी करा, असे उलट आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवसैनिकांनी दाखवले काळे झेंडे
भाजपच्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराबाबत निवेदन घेण्यास नकार दिल्यावर शिवसैनिकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. भ्रष्टाचाराबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर उठसूठ आरोप करणाऱया किरीट सोमय्या यांनी पिंपरी – चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी पंपनीतील कोटय़वधींचा घोटाळा, श्वान निर्बीजीकरणातील भ्रष्टाचारावर बोलावे, स्वपक्षातील भ्रष्टाचाऱयांची ईडी, इन्कमटॅक्स विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

































































