
काळाप्रमाणे काही विचार आणि भाषाही बदलावी लागते. प्रबोधनकार व बाळासाहेबांची भाषा ही त्या काळाची गरज होती. शिल्पकार घण घालून सुंदर मूर्ती बनवतो तसा त्यांनी समाज घडवला. आज मी छिन्नी-हातोडा घेऊन बसलो तर चालणार नाही. कारण मूर्ती घडलेली आहे. तिची फुले वाहून पूजा करणे ही काळाची गरज आहे; पण ती मोडायला, घडवलेला समाज बिघडवायला कुणी आले तर त्याच्यावर घण घालणे माझे काम आहे आणि ते मी करणार, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्या ‘मार्मिक प्रबोधनाचे शतक’ आणि ‘मर्मभेद’ तसेच प्रभाकर वाईरकर यांच्या ‘ज्वलंत रेषा’ अशा तीन पुस्तकांचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. ठाकरे कुटुंबावर आधारित पुस्तके प्रकाशित करणे याला खूप धाडस लागते. डिंपल पब्लिकेशन्सचे प्रकाशक अशोक मुळे यांनी आताच्या काळात हे धाडस दाखवले हे कौतुकास्पद आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
काwतुक ऐकणे आणि ठाकरे कुटुंब या दोन विरुद्ध दिशेच्या गोष्टी आहेत. कारण ढोंगावर लाथ मारण्याचे कर्तव्य बजावत ठाकरे कुटुंब पुढे चालले आहे. आम्ही कुणाचे गुरू नाही, पण सत्य आणि योग्य असेल त्याच्या खांद्याला खांदा लावून चालणारे ठाकरे कुटुंब आणि शिवसेना आहे, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी मांडल्या.
या सोहळय़ाला रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. व्यासपीठावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, पत्रकार-संपादक ज्ञानेश महाराव, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, नवशक्तीचे कार्यकारी संपादक प्रकाश सावंत, मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, संपादक विजय सामंत, राकेश टोळ्ये, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे, कौतुक मुळे, उपनेते भाऊ कोरगावकर, नितीन नांदगावकर, अखिल चित्रे आदी उपस्थित होते.
नाठाळाच्या माथी हाणा काठी!
‘मार्मिक प्रबोधनाचे शतक’ हे पुस्तकाचे नाव खरंच मार्मिक आहे; कारण प्रबोधनकारांनी 100 वर्षांपूर्वी ‘प्रबोधन’ नावाचे पाक्षिक सुरू करण्याचे धाडस केले होते. त्यातून विचारांच्या ठिणग्या समाजात पेरल्या. तसे आज कुणाला जमेल असे वाटत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अंधार असेल तिथे दिव्याने प्रकाश पाडा आणि श्वापदाप्रमाणे समाज बिघडवताहेत त्यांना ‘नाठाळाच्या माथी हाणा काठी’ उक्तीप्रमाणे गारद करून टाका, असा संदेशही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.































































