
एबीपी माझाने “माझा सन्मान” सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना जाहीर केला होता. मात्र, तो सन्मान महाजन यांनी नाकरला आहे. पुरस्कार नाकारण्यासाठी त्यांनी अत्यंत महत्त्वाचे कारण दिले आहे.
उल्का महाजन यांनी म्हटले आहे की, एबीपी माझाने माझी निवड “माझा सन्मान” साठी केली होती याबद्दल धन्यवाद. हा कार्यक्रम 1 जुलैला होणार होता. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडींमुळे तो पुढे ढकलला जाऊन आता 3 ऑगस्टला होत आहे. तो मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होईल, असे आपल्याला कळवण्यात आले.
ज्या पद्धतीने मतदारांचा, लोकशाहीचा व संविधानाचा मान न राखता हे सध्याचे सरकार भ्रष्टाचाराच्या आधारे सत्तेवर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींच्या हस्ते (ते संविधानिक पदावर असले तरीही) सन्मान स्वीकारणे माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटणारे नाही. त्यामुळे आपण हा पुरस्कार नाकारत आहोत, असे उल्का महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

































































