ही स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई; उद्धव ठाकरे यांची लोकशाही टिकवण्यासाठी एकजूटीची हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माध्यमं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. मात्र आजच बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. प्रसार माध्यमांच्या कार्यालयावर धाड टाकणे कोणत्या लोकशाहीत बसतं? याचा अर्थ आम्ही वाटेल ते करू, मात्र तुम्ही आवाज उठवायचा नाही. जर आवाज उठवला तर चिरडून टाकू ही पाशवी वृत्ती आज देशात फोफावायला बघत आहे. त्यामुळे जर आज आपण एकत्र आलो नाही आणि ताकद वाढवली नाही तर ते संपूर्ण देश खाऊन टाकतील. दोन दिवसांपूर्वी मी उत्तर भारतीयांच्या भेटीला गेलो तेव्हा मी म्हणालो होतो की, त्यावेळची लढाई ही स्वातंत्र्य मिळवण्याची लढाई होती. आताची लढाई ही स्वांतत्र्य टिकवण्याची लढाई आहे. असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

रियाझ शेख यांच्यासह रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांपासून मातोश्री आणि शिवसेना भवन येथे लोकांची रीघ लागलेलीच आहे. राज्यात सध्या जे सुरू आहे ते आम्हाला पसंत नाही. असे रियाझ शेख यांच्यासारखे अनेक जण म्हणत आहेत. हे असच सुरु राहिलं तर देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे हा देश वाचवण्यासाठी ते शिवसेनेसोबत येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पुढे ते म्हणाले की, गुलामगिरी ही गुलामगिरी असते ती स्वकीयांची असो किंवा परकीयांची. भारत माता पुन्हा गुलाम कशी होईल या दिशेने सध्या सरकारची पावलं पडत आहेत. ही पावलं ओळखून आपल्याला वेळेत एकत्र यायला हवं. रियाझ शेख यांच्या सोबत आज अनेक मुस्लिम बंधू भगिनी शिवसेनेत आल्या आहेत. शिवसेनेचं हिंदुत्व हे वेगळं सांगायची गरज नाही. मुस्लिम बांधव शिवसेनेत आल्यावर अनेक जण शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असं म्हणतात. मात्र काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत एका मशिदीत गेले होते त्याचं काय? काही दिवसांपूर्वी दत्तात्रय होसबाळे म्हणाले होते की, गोमांस खाणाऱ्यांना दरवाजा बंद करता येणार नाही. मग त्यांनी हिंदुत्व सोडलं असं म्हणायचं का?

शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले हिंदुत्व आम्ही मानतो. देशद्रोही हा कोणत्याही जाती धर्माचा असला तरी तो देशद्रोहीच. त्या देशद्रोहाला आमचा विरोध आहे. याच विचारामुळे आज मुस्लिम बांधव शिवसेनेसोबत आले आहेत. ही एकजूट शिवसेनेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखवणारी असेल. असे ठाकरे म्हणाले.