काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याची वंचितची तयारी! उद्धव ठाकरेंनी आघाडी घडवून आणावी – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीही सोबत असावी असे  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न आहेत. त्यांना आम्ही मुभा दिली आहे. त्यांनी या दोन्ही पक्षांना घेऊन यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायची असे प्रयत्न उद्धव ठाकरे यांचे सुरू आहेत. याबाबत आम्ही त्यांना मुभा दिली आहे की, तुम्ही या दोन्ही पक्षांना घेऊन या, आम्ही त्यांचे हार घालून स्वागत करू. या दोघांनाही आमचा विरोध नाही. हे येत असतील तर फार चांगले आहे. या प्रयत्नांना यश येईल पिंवा नाही हे मी सांगू शकत नाही, मात्र ज्या दिवशी यश आले असे कळेल त्या दिवशी आमची युती होईल. हार घालण्याची वेळ येण्यासाठी त्यांनी मान पुढे केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

मोदी गावच्या सरपंचासारखे वागताहेत

मुंबईत महाविकास आघाडी, शिवसेनेने केलेल्या कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत येऊन गेले. त्याचा संदर्भ देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे गावच्या सरपंचासारखे वागत आहेत. मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी दोन वेळा येऊन पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानपदाची खुर्ची ही ग्रामपंचायत पातळीवर आणली आहे याचे दुःख होते.