कोपरगावमध्ये तीव्र पाणीटंचाई; दहा दिवसाआड पाणीपुरवठा

कोपरगावला पुन्हा एकदा तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱया दारणा धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता, नगरपालिकेने आणखी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शहरात आठऐवजी 10 दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. पालिकेकडून सोमवारी पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

यावर्षीही धरणात 31 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी जून-जुलै महिन्यापर्यंत पुरावे, यादृष्टीने 10 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कोपरगाव नगरपालिकेने घेतला आहे. कोपरगावला दर महिन्याला 5 दलघमी इतके पाणी लागते. त्यामुळे हे पाणी 10 दिवसाआड वितरित करूनही जून महिन्यापर्यंत पुरेल इतके राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जून-जुलैमध्ये पाऊस सुरू झाला नाही तर कोपरगावची अवस्था आणखी बिकट होऊ शकते.

पालिकेच्या वतीने पत्रक जाहीर करण्यात आले आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पाटबंधारे विभागामार्फत पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. डाव्या कालव्याद्वारे येणारे आवर्तन उशिरा सोडणार असल्यामुळे पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यासाठी पाणीपुरवठा 10 दिवसाआड करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप व पाणीपुरवठा विभागाचे लिपिक स्वप्नील जाधव यांनी दिली.

पाण्याबाबतचे नियोजन

n नगरपालिकेच्या वतीने पाण्याबाबत नियोजन तक्ता जाहीर करण्यात आला आहे. ए-बी-सी-डी-ई असे पाच भाग तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार दिनांक 25 एप्रिलपर्यंत पहिला पाणीपुरवठा केला जाईल. 26 एप्रिल ते 1 मे पाणीपुरवठा बंद राहील. 2 ते 6 मे दुसऱया टप्प्यात पाणीपुरवठा केला जाईल. 7 ते 12 मे पर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. तिसऱया टप्प्यात 13 ते 17 मे पाणीपुरवठा केला जाईल. 18 ते 23 मे पाणीपुरवठा बंद राहील. चौथ्या टप्प्यात 24 ते 28 मे दरम्यान पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.