
बेकायदेशीर अटक आणि नजरकैदेसारख्या कारवाया झाल्या तरी आपण आणि आपले सहकारी आपले प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी म्हटले आहे. सौरभ दास आणि आशुतोष रांका परतल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येऊ आणि पुढची रणनीती ठरवू, असेही ते म्हणाले.
दिल्लीत एएनआयशी बोलताना दीपके म्हणाले की, सौरभ आणि आशुतोष यांची रविवारी सुटका होईल, अशी त्यांना आशा आहे. ते कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी वकील वृंदा ग्रोव्हर यांना भेटण्यासाठी जात होते.
“सौरभ आणि आशु आल्यावर आम्ही सर्वजण एकत्र जमू, पुन्हा रणनीती आखू आणि पुढे कसे जायचे ते ठरवू. गेल्या काही दिवसांत बेकायदेशीर अटक आणि नजरकैदेसारख्या ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या आहेत, त्यावरून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट होते. मात्र आम्ही ना घाबरणार आहोत, ना मागे हटणार आहोत. ही एक मोठी लढाई आहे आणि आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत,” असेही दीपके म्हणाले आहेत.
दरम्यान, दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये प्रस्तावित लहरा दो तिरंगा रॅलीपूर्वी शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी दीपके यांना ताब्यात घेतले होते. भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३ अंतर्गत मध्य दिल्लीत सार्वजनिक सभांवर बंदी घालण्यात आली असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना BNSS च्या कलम १२६ आणि १७० अंतर्गत एका नव्या प्रतिबंधात्मक कारवाईत अटक करण्यात आली. शनिवारी दीपके यांना अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. पीस बाँडवर स्वाक्षरी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातून त्यांची सुटका करण्यात आली.
























































