World Heritage Day 2026 – छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वर्ल्ड हेरिटेज डे उत्साहात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड हेरिटेज डे निमित्त छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विविध सांस्कृतिक उपक्रम, कार्यशाळा आणि सादरीकरणांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. जागतिक वारशाचा समृद्ध अनुभव देणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थी, कुटुंबीय आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत रंगलेल्या या सोहळ्याने संग्रहालय परिसरात उत्साही वातावरण निर्माण केले होते.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक कलांचे थेट दर्शन आणि कार्यशाळा. कलाकार प्रीती बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या ‘मधुबनी पोस्टकार्ड’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत स्वतःच्या कलाकृती साकारल्या. यावेळी प्राची वाघ यांचे कथक नृत्याचे सादरीकरण आणि अनुराधा डान्सेस द बिहू’ या सत्रातून आसामच्या संस्कृतीची एक छोटी झलक पाहायला मिळाली. या कार्यक्रमांच्या माध्यमातून उपस्थितांना हिंदुस्थानच्या विविध प्रांतांतील शास्त्रीय आणि लोकनृत्यांची झलक अनुभवता आली.

केवळ सादरीकरणेच नव्हे, तर प्राचीन तंत्रज्ञान आणि हस्तकलेची ओळख करून देण्यासाठी विविध प्रात्यक्षिकांचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘विव्हर्स सेंटर’तर्फे हँडलूम विणकामाचा अनुभव, कलाकार अरुप मलाकर यांच्याकडून ‘शोलापीठ’ फुलनिर्मिती आणि अन्वर हुसैन शेख यांनी सादर केलेली ‘दगडी साधननिर्मिती’ या उपक्रमांनी प्रेक्षकांना थक्क केले. या उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने केवळ वारसा जतन करण्याचा संदेशच दिला नाही, तर सामान्य नागरिक आणि कलाकारांमध्ये थेट संवादाचा एक दुवा निर्माण केला.