भाजपची बाजू मांडण्यासाठी केंद्राच्या कांदा निर्यातदारांना धमक्या

>>बाबासाहेब गायकवाड

कांदा निर्यातबंदीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील भाजपा उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. यातून सावरण्यासाठी, भाजपाची बाजू मांडण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील कांदा निर्यातदारांना धमक्या दिल्या जात आहेत. दरम्यान, निर्यातबंदीमुळे चीन, पाकिस्तानचा फायदा होतोय, युरोपसह इतर बाजारपेठा अन्य देशांनी काबीज केल्याने हिंदुस्थानची जगात पत गेलीय, शेतकऱयांबरोबरच व्यापारीही देशोधडीला लागले आहेत, ही वस्तुस्थिती सांगणारा उलट अहवाल पाठवून निर्यातदारांनी केंद्र सरकारच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.

केंद्र सरकारने डिसेंबर 2023 पासून कांदा निर्यातबंदी केली आहे. असे असतानाच मतांवर डोळा ठेवून गुजरातच्या पांढऱया कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. महाराष्ट्रातून 99 हजार 150 मेट्रिक टन निर्यातीला परवानगी दिल्याची अफवा पसरवून दिशाभूल केली. यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. यातून सावरण्यासाठी निर्यातदार व्यापाऱयांनी भाजपाची बाजू मांडावी, यासाठी धावाधाव सुरू आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयातील एका महिला सचिवांनी निर्यातदारांशी संपर्क सुरू केला आहे. निर्यातबंदी कशी चांगली आहे हे जनतेसमोर वृत्तपत्र व मीडियातून मांडा, असा दबाव त्यांच्यावर टाकला जात आहे. या धमकीला भीक न घालता निर्यातबंदी कशी चुकीची आहे, देश, शेतकरी आणि निर्यातदार व्यापारी यांचे कसे नुकसान होत आहे, कांदा उत्पादनाची स्थिती काय आहे, ही वस्तुस्थिती सांगणारा अहवालच निर्यातदारांनी या सचिव बाईंना पाठविला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तरी हे धोरण बदला, अशी सूचनाच केली आहे.

निर्यातबंदीच्या धोरणाचे दीर्घकाळ परिणाम जाणवणार असून, जागतिक बाजारपेठेत हिंदुस्थानची पत घटली आहे. वॉलमार्ट, इकोनसेव्ह कॅश आणि कॅरी ऍण्ड सेगी फ्रेश यांनी हिंदुस्थानी निर्यातदारांना मागेच इशारा दिला आहे. अनेक नवीन देश यात उतरलेत आणि यामुळे आपली मोठा पुरवठादार ही ओळख धोक्यात आली आहे, असे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

तस्करी गंभीर विषय

निर्यातबंदीमुळे कांदा तस्करी हा गंभीर विषय झाला आहे. श्रीलंकेतील कार्गील हे मोठे हायपर मार्केट त्यांच्या सर्व स्टोअर्समध्ये हिंदुस्थानचा कांदा 560 रुपये किलोने विकत आहे. कोलंबोच्या मिडसिटी मार्केटिंगकडून हा कांदा घेत असल्याचे सांगितले जाते. कांद्यासह द्राक्ष, भाज्या, बटाटा यांचे अनेक कंटेनर रोज दुबई, मलेशिया, श्रीलंकेला पोहोचत आहेत. हिंदुस्थानातील निर्यातदार आणि सर्व स्टॉक होल्डर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संधीसाधू मात्र अब्जावधी रुपये कमवत आहेत. सरकारने यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.