
सामना ऑनलाईन । नागपूर
भारतीय वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन करीत रात्रीच्या वेळी टी वन वाघिणीची (अवनी) शिकार केल्याच्या युवक कॉंग्रेसतर्फे “टायगर कॅपिटल’ म्हणून फलक लावलेल्या सिव्हील लाईन्स परिसरात आंदोलन करुन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. असगर अलीकडे शिकारीचा परवाना नसताना वाघिणीची शिकार कशी केली. भारतीय जनता पक्षाकडून कायम वाघाच्या संवर्धनाचे नारे दिले जात असताना टी वन वाघिणीला मारण्याचे आदेश का दिले, असे सवालही युवक काँग्रेसने केले आहेत. तिला बेशुद्ध करुन जेरबंदही करता आले असते असे सांगत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. टी वन वाघिणीची शिकार हा खुनच आहे. यावरुन सरकार वन्यजीव वाचविण्यासही असमर्थ ठरत असल्याचे उघड झाल्याने आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. वनमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही युवक कॉंग्रेसचे दक्षिण महासचिव महेश बालपांडे आणि नागपूर युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल पुरी यांनी दिला आहे.
अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत म्हणून माघार घ्यावी
टी 1 वाघिणीला (अवनी) वन विभागाने ठार मारल्याने महानायक अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत म्हणून माघार घ्यावी अशी मागणी वन्यजीव प्रेमी आणि पिपल्स फॉर ऑनिमनलच्या पदाधिकारी करिश्मा गिलानी यांनी केली. वाघांच्या संवर्धनासाठी अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूताची जबाबदारी स्विकारली आहे. त्याला वन विभागाकडूनच तिलांजली दिली जात असल्याने व्याघ्रदूत म्हणून माघार घ्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
































































