
हिंगोली येथील शिवसेनेच्या सभेत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी गद्दारांना चांगलेच फटकारले आहे. शिवसेना म्हणजे आग, ज्वालामुखी आहे, या आगीशी खेळाल तर जळून राख झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी गद्दारांना दिला आहे. तसेच गद्दारांनी विकास, निष्ठा यांची प्रवचने करू नये, आमची किंमत 50 कोटी लावली आणि आम्ही विकले गेलो, असे त्यांनी सांगावे, असेही ते म्हणाले.
हिंगोलीतील निष्ठावंत शिवसैनिक आणि हे वातावरण पाहिल्यावर असे वाटत नाही की, गद्दार पुन्हा निवडणुकीला उभा राहील. आज सकाळपासून विदर्भात फिरत होतो, काल आम्ही विदर्भात आलो, नागपूरला विमानातून उतरलो, आमच्यासोबत विमानात मुख्यमंत्री फडणवीस होते. विमानतळाबाहेर हजारो शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी उभे होते. आज यवतमाळ, वाशीम या दोन्ही ठिकाणा प्रचंड सभा झाल्या. यवतमाळच्या गद्दाराला गाडून आता हिंगोलीतील गद्दाराला गाडण्यासाठी आम्ही आलो आहोत. एकही गद्दार शिल्लक राहणार नाही. हिंदुहृदसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य मला नेहमी आठवते, एकवेळ लढला नाहीस तरी चालेल, पण विकला जाऊ नकोस, असे ते म्हणायचे. मात्र, आता इथला गद्दार 50 कोटींना विकला गेला, स्वतः लिलावात उभा राहिला आणि म्हणाला माझी किंमत करा, आणि बैल, गाढवे विकत घेतात, त्याप्रमाणे त्याला 50 कोटीला विकत घेण्यात आले.
दोनतीन दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी त्याचा रस्ता अडवला, त्याला इशारा दिला. त्यानंतर ते महाशय म्हणतात, मी सुद्धा बघून घेई, आता ते काय बघणार? या निष्ठावंतांच्या फौजेशी सामना करणे सोपी गोष्ट नाही. त्यांनी पळवून लावले नाही, तर निष्ठावंत शिवसैनिक नाव सांगणार नाही. जे गद्दार गेले आहेत, त्या सर्वांचे एकच म्हणणे आहे की, आम्हाला आमच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. विकास करायचा आहे म्हणजे नेमके काय यांना हिंगोलीचे दुबई करायचे आहे, सिंगापूर की स्वित्झर्लंड करायचे आहे? जनतेला काय हवे आहे, जनतेला अन्न, वस्त्र, निवारा हवा आहे. लोकांच्या जास्त मागण्या नाहीत.
शक्तीपीठ महामार्ग जात असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमीनी जबरदस्तीने घेण्यात येत आहेत. शेतकरी लढतोय, आत्महत्या करातोय, आपली जमीन जाऊ नये, यासाठी, कधीतरी त्या शेतकऱ्यांच्या बाजूने आष्टेकर उभे राहिले काय? आणि आता ते विकासाच्या गोष्टी करत आहेत. त्यांना या बेइमानीची किंमत मोजावी लागेल. शिवसेनेशी बेइमानी त्यांना महागात पडेल. हिंदुहृदसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली ही शिवसेना म्हणजे आग, ज्वालामुखी आहे. या आगीस खेळलात तर आगीत जळून राख झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच आमच्या अंगावर येण्याची भाषाच करू नका. तुम्ही पोलीस बंदोबस्तात, बॉडीगार्डच्या गराड्यात असाल, मात्र, ही शिवसैनिकांची निष्ठावंतांची फौज, शिवसेनेची ताकद भविष्यात काय करते, ते तुम्हांला दिसेल. आम्ही आजही ताकदीने उभे आहोत. आमचे आमदार फोडा, खासदार फोडा, पैशांच्या ताकदीवर हैदोस घाला पण या शिवसेनेला तुम्हाला संपवता येणार नाही. हिंदुहृदसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यातून निर्माण झालेली, ही शिवसेना आहे. त्यांनी शिवसेनेत अग्नी आणि निष्ठा निर्माण केली आहे. त्यामुळे गद्दार आणि बेइमानांना इथे स्थान नाही.
प्रभू श्रीरामाचे मंदिर ज्यांनी लुटलंय, त्या भाजपचे बूट चाटायला हे महाशय गेले आहेत. अयोध्येचा लढा, श्रीरामाचा लढा हिंदुहृदसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला. मात्र, हमने राम को लाया है, असे ते म्हणतात. पण राम आता पुन्हा वनवासाला निघाला आहे. अयोध्येत रामाच्या दानपेट्या चोरीला गेल्या. श्री रामाच्या मंदिरातून साडेपाचशे कोटी रुपये भाजपच्या लोकांनी चोरले, चांदीच्या विटा चोरले, रामाचे दागिने चोरले आणि हे हिंदुत्ववादी म्हणवतात. त्यामुळे या भाजपवाल्यांना कंटाळून पुन्हा श्रीराम वनवासाला निघाले असतील, तर आपले कर्तव्य आहे की, त्या श्रीरामासाठी आपल्याला पुन्हा लढा उभारावा लागेल आणि रामाला वनवासात जाण्यापासून आपल्याला थांबवावे लागेल. त्यासाठी भाजप आणि गद्दारांना गाडावे लागेल. त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत.
आता त्यांनी विकास, निधी यासाठी गेलो, असे सांगत आहेत. आता त्यांनी यावर प्रवचन देऊ नये. त्यांनी सरळ सांगावे त्यांची किंमत 50 कोटी लावली आणि ते विकले गेले. खरेतर त्यांची किंमत 500 रुपयेही नव्हती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना खासदार केले नसते, तर त्यांची काय किमत होती. आता 2029 मध्ये पुन्हा त्यांना 500 रुपयांवर आणाचे आहे आणि शिवसेनेचा खासदार आपल्याला विजयी करायचा आहे, असे ते म्हणाले.































































