राम मंदिरावर दरोडा घालणारे हे नवे बाबर! उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यवतमाळमधील झंझावाती सभेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ वाशीममधील कार्यकर्ता मेळाव्यात धडाडली. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी गद्दारांचा आणि राममंदिरातील देणगी घोटाळ्यावरून सत्ताधारी भाजपचा समाचार घेतला. राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी रक्त सांडले, जीव गमावले, अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दंगली झाल्या. या घटनेने देशभरात हिंदुत्वाची लाट निर्माण झाली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख फिरले नसते तर, भाजपला गावातील काळ्या कुत्र्यांनीही ओळखले नसते. त्यावेळी निर्माण झालेल्या हिंदुत्वाच्या लाटेने राम मंदिर निर्माण झाले, आपल्याला अभिमान वाटला. त्या राम मंदिरावर दरोडा घालणारे आताचे हे बाबर आहेत, अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली.

गेल्या आठदहा दिवसांपासून बातम्या सुरू आहेत की, शिवसेनेतून काही गद्दार फुटले, त्यानंतर काहीजणांनी कोल्हेकुई सुरू केली की, शिवसेना संपली, उद्धव ठाकरे फिरत नाहीत. मग म्हटले आता मी फिरतोच आणि राहिलेली शिवसेना दाखवतोच. तिची ताकदही दाखवतो. संजय राऊत म्हणाले, त्याप्रमाणे आता हरामखोर गेलेत, नमकहराम गेलेत, पण कट्टर, कडवट एकही शिवसैनिक जागचा हललेला नाही. काहीवेळा चांगल्या गोष्टींना नजर लागते. आपला हा वाशीम, यवतमाळ मतदारसंघ आहे, हा आपला शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला आहे. वाशिम जिल्ह्याची निर्मितीच हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. ज्याच्या हातामध्ये भगवा आहे, तो आपला, असे समजून व्यक्ती न बघता तुम्ही मतदान केले. तुम्ही आमदार, खासदार निवडून दिले. मात्र, दोनचार वर्षांपासून गद्दारीची कीड येथे लागली. आधीचा होता त्याने गद्दारी केली, त्याला गाडायचे म्हणून नवे बुजगावणे उभे केले. त्या बुजगावण्यानेही गद्दारी केली. मात्र, आता गद्दारी आणि नमकहरामीला थारा द्यायचा नाही. नमकहरामी हा शब्द शिवी नाही, हे बघूनच तो वापरतोय. जो उपकराकर्ता असतो, त्याचे उपकार विसरून, त्याच्याशी जो दगाबाजी करतो, तो नमकहराम तो हरामखोर. त्यामुळे मिंध्यापासून सगळेच नमकहराम, हरामखोर आहेत.

शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी रक्ताचे पाणी करत रक्त आटवले आणि त्यांची स्वप्ने पूर्ण झाली. मात्र, सध्या हे लुटारु अवढे माजलेत की, ते राम मंदिरच लुटायला निघाले आहेत. ज्या एका राम मंदिराच्या मुद्द्याने लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा काढत संपूर्ण देश हिंदुत्त्वमय करून टाकला. मंदिर वही बनायेंगे, अशा घोषणा दिल्या. पण बाबरी पाडली तेव्हा शेपट्या घालून पळालेली अवलाद आहेत हे. म्हणजे अंगावर काही आले की, शेपट्या घालायच्या, ते सर्व गंडातर शिवसेनाप्रमुखांनी अंगावर घेतले होते. सगळे पळाले होते, एकही शिल्लक नव्हता. आता 56 इंच छातीवाले म्हणवणारे त्यावेळी एकही उभे नव्हते. त्यावेळी भाजपचे नामोनिशान नव्हते. एक कोणीतरी भाजपवाला म्हणाला होता, हे आमचे काम नाही. कसे असणार त्याचे काम? शौर्य गाजवणे हे भाजपचे काम नाही. शौर्य आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुख गरजले होते, जर हे माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर त्यांचा मला गर्व आहे. त्यावेळी वाजपेयी, आडवाणी यांनी हे अच्छा नही हुआ, ये काला दिन था, असे वक्तव्य करत होते. ते सर्व पाप त्यांनी आमच्या माथी मारले आणि जे राममंदिर न्यायालयाच्या आदेशाने उभारले गेले, त्याचे श्रेय घेण्यासाठी हे टिकोजीराव गेले. त्या राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी रक्त सांडले आहे. जीव गमावे आहे. अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहे. दंगली झाल्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या घटनेने देशभरात हिंदुत्वाची लाट निर्माण झाली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख फिरले नसते ,तर भाजपला गावातील काळ्या कुत्र्यांनीही ओळखले नसते. त्यावेळी निर्माण झालेल्या हिंदुत्वाच्या लाटेने राम मंदिर निर्माण झाले, आपल्याला अभिमान वाटला. त्या राम मंदिरावर दरोडा घालणारे आताचे हे बाबर आहेत. त्या काळात मंदिर पाडले गेले होते. आता बांधलेल्या मंदिरात दरोडा घालणारे, बाबराची अवलादच आहेत, असे ते म्हणाले.

गद्दारी फक्त उद्धव ठाकरेंशी नाही झाली, शिवसेनेशी नाही झाली, तुमच्याशी नाही झाली तर देशातील सर्व हिंदुंशी झालेली गद्दारी आहे. हिंदुच्या भावनांची आणि हिंदुत्वाशी झालेली गद्दारी आहे. हे गद्दार जे तिकडे गेलेत, त्यांच्यातील एकात तरी लोकसभेत प्रश्न विचारण्याची हिंमत आहे की, राम मंदिरात लूट होत आहे, मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या नावाने मंदिराच्या जमिनींचे घोटाळे होत आहेत. कोट्यवधींच्या जमिनी लाटल्याचे अनेक घोटाळे उघड होत आहे. याबाबत कोणामध्ये प्रश्न विचारण्याची हिंमत आहे. राजस्थानमध्ये चौधरी नावाचे मंत्री आहेत. ते ज्या समितीचे उपाध्यक्ष आहेत, त्याने स्वतःच्याच काकडीच्या शेताला 99 लाखांचे अनुदान दिले. शेतकरी हमीभावासाठी मागणी करत आहेत. हमीभाव मिळण्यासाठी खासदार, आमदार व्हावे लागते. त्या चौधरींनी स्वतःच्याच समितीकडून स्वतःच्याच शेतला अनुदान दिले. याला म्हणतात कोल्हा काकडीला राजी. कोल्हा म्हणजे शुद्र वृत्तीचा माणूस त्याला काकडीही चालते. तसेच या गद्दारांना तुमचे प्रेम पचले नाही पण गद्दारी पचते म्हणून त्यांनी नमकहारामी केली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हा राममंदिराचा मुद्दा, हिंदुत्वाशी, आपल्याशी गद्दारी केलेला मुद्दा सोडता येणार नाही, सोडू शकत नाही. आम्ही अस्सल कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. मराठी आहेत, आमच्या हातात छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. आम्हीही जय शिवराय, जय श्रीराम म्हणतो. पण भाजपचे हिंदुत्व हे भोंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व हे देशाभिमानी हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व घरे पेटवणारे नाही, तर घरातील चूल पेटवणारे आहे. आमचे हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम देणारे आहे. फक्त माथी भडकवून काहीही होणार नाही, असे ते म्हणाले.

हे गद्दार गेले, त्यांना आपणच उमेदवारी दिली होती. त्यामुळे इथल्या मतदारांची माफी मागायला आलो आहे. तेव्हा आपल्याला डिवचले होते, तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. त्यामुळे आता ठेवला चेहरा बाजूला, शिवसेनाप्रमुखांचा चेहरा आणि मशाल चिन्ह घेऊन आम्ही मैदानात उतरलो. गद्दारांनी, नमकहरामांनी पक्ष चोरला, निशाणी चोरली, वडिलही चोरले तरीही आपण आपल्या हक्काचे 9 खासदार मशाल या चिन्हावर निवडून आणले होते. लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात आपण आलो होतो. तेव्हा तुम्ही सर्व आपल्यासोबत होता. याआधीही या माणसाने गद्दारी केली होती. त्यावेळी माझ्या 82 वर्षांच्या आईने सांगितले म्हणून मी शिवसेनेसोबत आले होते. त्यावेळी ते आईच्या नावाने खोटे बोलले होते. आता मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती, तेव्हा मुलीची सोयरिक जमवायची बैठक असल्याचे सांगितले. ते स्वतःची सोयरिक जुळवत होते. किती खोके देणार, ती बोलणी सुरू होती. आई आणि मुलीच्या नावाने खोटे बोलणारा माणूस आपल्याशी खोटे बोलणारा माणूस विकासासाठी गेला असेल, असे वाटते का, असा सवाल त्यांनी केला. ते कधीतरी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले का, शेतकऱ्यांसाठी कधी लोकसभेत आवाज उठवला का. ते देत असलेले विकास निधीचे कारण असेल तर विकास होणार नाही, म्हणून भाजपशिवाय कोणालाच मत द्यायचे नाही का, असा सवालही त्यांनी केला.

हा प्रश्न फक्त तुमचा आणि आमचा नाही, हा देशाचा प्रश्न आहे. लोकसभेवेळी अबकी बार 400 पार करत होते. त्यांना संविधान बदलायचे आहे. डिलिमीटेशनचे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी ते अनेक पक्ष फोडत आहे. खोके घेत गद्दारांकडे जात ते फोडाफोडी करत आहे. शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती केली होती. कर्जमाफी हा शब्द आपल्याकडे नाही. कोणत्याही अटीशर्तीशिवाय आम्ही कर्जमुक्ती केली होती. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारे कोण, तसेच मिंधे आणि गद्दार याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणार आहेत का? कोणी प्रश्नच विचारू नये, म्हणून फोडाफोडी होत आहे, असेही ते म्हणाले.

गद्दार गेले असला तरी मी हललेलो नाही. मी ठामपणा उभा आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी ठामपणे उभा आहे. तुमच्यासारखे शिवसैनिक असताना कोणातीही भीती नाही. कितीही संकटे येऊ देत, त्यांना पायदळी तुडवत त्यांच्या छाताडावर पाय रोवून आपण पुढे जाणार आहोत. ही गद्दारीची कीड गाडण्यासाठी आता तुम्ही तयार राहायला हवे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात उतरा, हे आपले त्याला आव्हान आहे. आता तो जिथे दिसेल, तिथे त्याला जाब विचारा. आता ज्याची जशी भाषा असेल त्याला त्याच्या भाषेतच जाब विचारायचा. निवडणुकीची तयार आतापासूनच करा, तयारीला लागा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.