
खालापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटी रेबीज व्हॅक्सिनसह २५ औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांना ही औषधे खासगी मेडिकलमधून विकत घ्यावी लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाच्या या गलथान कारभाराबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
खालापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आदिवासी-ठाकूर समाज वास्तव्यास असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची दरदिवशी जत्रेप्रमाणे गर्दी असते. मात्र येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची मोठी निराशा होत आहे. आरोग्य केंद्रात औषधांचा नेहमी तुटवडा असतो. त्यामुळे रुग्णांना काही औषधे खासगी मेडिकलमधून विकत घ्यावी लागत आहेत. काही रुग्णांकडे औषधे घेण्यासाठी पैसे नसल्याने ते औषधे न घेताच पुन्हा आपल्या घराचा रस्ता धरत आहेत.
गोरगरीबांचे आरोग्य धोक्यात
खालापूर तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे आदिवासी, ठाकूर समाजातील जनतेसह गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या ठिकाणी औषधांचा तुटवडा भासत असल्याने अनेक रुग्ण उपचार न घेताच पुन्हा माघारी जात आहेत. त्यामुळे या रुग्णांचे आरोग्य आणखी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अनिल पिंगळे यांनी व्यक्त केली आहे.




























































