ठाणे कारागृहातील बेकरीत खाद्यपदार्थांची रेलचेल; 25 कैद्यांना विशेष प्रशिक्षण 

चविष्ट, स्वादिष्ट आणि आरोग्यर्वधक बेकरी पदार्थांसाठी सुपरिचित असलेल्या ठाणे कारागृहातील बेकरी विभागाने आपली कक्षा आणखी रुंदावली आहे. त्या बेकरीतून आता 25 प्रकारचे खाद्य पदार्थ नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी 22 कैद्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहेत. तेव्हा केक, खारी, टोस्ट या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या कारागृहातील बेकरीतून आणखी वेगळ्या प्रकारचे केक तसेच पिझ्झाची चव चाखण्याची संधी मिळणार आहे.

ठाणे कारागृहातील बेकरीत कैद्यांमार्फत दर्जेदार खाद्यपदार्थ बनवले जातात. ग्लुटीन, ईट आदींचे योग्य प्रमाण व शरिराला त्रासदायक ठरणार नाही असे केक, बिस्किट, खारी, टोस्ट असे रुचकर पदार्थ नागरिकांना विकले जात होते. नागरिकांकडून कैद्यांनी बनवलेल्या या पदार्थांना चांगली मागणी होती. त्यामुळे याची दखल घेत अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता, कारागृह अधिक्षिका राणी भोसले यांनी बेकरी पदार्थांची संख्या व त्याचा दर्जा वाढविण्याचे ठरवले. मग ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे स्माँल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशन आणि चेंबर आँफ स्माँल इंडस्ट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बेकरीत काम करणाऱ्या 25 कैद्यांना एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे कैद्यांकडून आता आणखी स्वादिस्ट आणि आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ तयार केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

बेकरीत बनणार हे पदार्थ

स्पाँज, पायनापल, मावा, ब्लँक फाँरेस्ट, चाँकलेट, रवा केक, नाचणी, जिंजिर, पायनापल, कोकनट एग बिस्किट, जिरा बटर, खारी, टोस्ट, ब्रेड, ड्रायफुट कुकीज, बेसन नानकटाई, मेडलिन केक, गव्हाची नानकटाई, कोकोनट मँकरून्स, स्विज बेरी, मेल्टिंग मुव्हमेंट बिस्किट, चाँकलेट बिस्किट आणि पिझ्झा मिळणार आहे.

केकला विशेष मागणी

ठाणे कारागृहातील बेकरीमध्ये बनणाऱ्या केकना नाताळ सणात विशेष मागणी असते. बाजारात नामांकित कंपनीचे केक उपलब्ध असताना कारागृह बेकरीतील विविध केकना नागरिकांकडून जोरदार मागणी असते. प्रत्येकवर्षी नाताळमध्ये हजारो रुपयांच्या केकची विक्री होते. आता केकसोबतच विविध पदार्थ उपलब्ध होणार आहे.