
संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. बारामतीमध्ये झालेल्या भीषण चार्टर विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय दिल्लीवरून बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी एका शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Devastated) उद्ध्वस्त , असे स्टेटस त्यांनी टाकले आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण पवार कुटुंब आणि महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अनेक ठिकाणी अजित पवारांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांसाठी ते मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. हे विमान बारामती विमान तळावर उतरत असतानाच हा अपघात झाला. यावेळी विमानात अजित पवारांसह एकूण सहा जण होते. मृतांमध्ये अजित पवार, मुंबई पीसओ, दोन पायलट आणि फ्लाईट अटेंडन्ट यांचा समावेश होता.


























































