महिलांच्या राजकीय हिताच्या आड शिवसेना कधीही आलेली नाही आणि येणार नाही – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला आरक्षणाच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे. महिलांच्या राजकीय हिताच्या आड शिवसेना कधीही आलेली नाही आणि येणार नाही, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मुंबईतल्या ड्रग्जप्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने तोंड उघडले आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचा कार्यध्यक्ष केले जाणार आहे का यावर संजय राऊत म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे निर्णय घेतले जातात. माननीय उद्धव ठाकरेसुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. आणि जर आदित्य ठाकरे यांचे आपल्या माध्यमातून कार्यध्यक्षपदासाठी नाव समोर येत असेल तर त्याचे नक्कीच स्वागत केले पाहिजे. तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना, पुढील राजकारण तरुणांच्या हातात गेले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. पक्षांतर्गत पक्षाबाबत चर्चा होत असते. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत आदित्य ठाकरे आणि त्यांच्या टीमने उत्तम काम केले आहे असे संजय राऊत म्हणाले.

उद्या लोकसभेत महिला आरक्षणावर चर्चा होणार आहे. या विधेयकांमुळे देशात आग लागलेली आहे. उत्तर वि. दक्षिण असा संघर्ष सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. हे अत्यंत गंभीर विषय आहेत. विधानपरिषदेत कोण जाणार याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्याकडे बराच वेळ आहे.

महिला आरक्षणाच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे. महिलांच्या राजकीय हिताच्या आड शिवसेना कधीही आलेली नाही आणि येणार नाही. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला राजकीय आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. आपण जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संदर्भ देतो, त्यांनी हेच मार्गदर्शन केले आहे की महिलांना सक्षम केले पाहिजे. तसं नसतं तर मुंबईच्या महापौरपदी महिला नसत्या. किंवा विधीमंडळातही महिला आमदार नसत्या. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे असं पंतप्रधान मोदी सांगतात. सर्वपक्षीय महिलांना हे विधेयक आपलं वाटत असेल तर त्याला शिवसेना किंवा इतर पक्षांनी विरोध केलेला नाही. ज्या पद्धतीने मतदारसंघाची पुनर्रचना आणि जनगणना न करता या सगळ्या विषयांना पुढे नेलं जात आहे तिथे वादाचा विषय आहे.

मुंबईतल्या ड्रग्जप्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने तोंड उघडले आहे का? फक्त याला धडा शिकव त्याला धडा शिकव, त्याला सोडणार नाही किंवा याला सोडणार नाही ही मुख्यमंत्र्यांची ठरलेली वाक्य आहेत. या विधेयकासाठी महिलांचे मिसकॉल मागत आहेत आणि भाजपच्या नेत्या घरोघरी पुष्पगुच्छ घेऊन जात आहेत त्यांनी नाशिकमध्ये असंख्य महिलांचे शोषण होत असताना सरकार काय करत होते? या संदर्भात बोलायला पाहिजे. नाशिकमध्ये भोंदू बाबाने साधारणतः 500 पेक्षा जास्त महिलांचे शोषण केले तेव्हा सरकार झोपलं होतं का? आता अमरावतीचं एक प्रकरण समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात हजारोंवर जास्त महिलांचे शोषण झाले आहे आणि विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आमच्याकडे मिसकॉल मागताय? महिलांच्या सुरक्षेसाठी तुमचं गृहखातं काय करत आहे? देवेंद्रजी तुम्ही यावर बोला आणि तुमच्या महिला आघाडीला बोलायला लावा. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री अशा भोंदू लोकांच्या चरणी नतमस्तक झाले तर लोकांना काय आदर्श मिळणार हा साधा प्रश्न आहे.

ड्रग्जची सर्वात मोठी फॅक्टरी साताऱ्यात सापडली. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. केला की नाही हे त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं. तुमच्या पोलीस अधीक्षकांनी किती लोकांना वाचवलं, तुमचे काय आदेश होते. हा सगळा ड्रग्जचा पैसा राजकारणात आलेला आहे. मुंबईत तरुण मुले मेली, मुंबई, नागपूरसारख्या शहरांत खुलेआमपणे ड्रग्जचा व्यवहार होतोय. शाळा आणि कॉलेजच्या बाहेर ड्रग्ज विकले जात आहेत, याबाबत आम्ही मोर्चे काढले. या सगळ्या संदर्भात सरकार काय करत आहे? आणि हा ड्रग्जचा आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू हा गुजरात मुंद्रा पोर्ट आहे. मुंद्रा पोर्टवर हा माल उतारला जातो आणि संपूर्ण देशात वितरित केला जातो. देशाच्या नव्हे तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी निवडणुकांच्या प्रचारापेक्षा राज्याच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.