तिरंग्याचा आदर राखा; तिरंगी रिबीन कापण्यास नकार देत ओमर अब्दुल्ला यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. श्रीनगरमधील एका कार्यक्रमात तिरंगी रंगाची रिबीन कापण्यास नकार देत त्यांनी राष्ट्रध्वजाबद्दलचा आपला आदर व्यक्त केला आणि आयोजकांना तिरंग्याचा आदर राखा असे आवाहनही केले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीनगरमधील प्रसिद्ध कश्मीर हाट येथे ‘नो युअर आर्टिझन्स’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पोहोचले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी, सल्लागार नासिर अस्लम वानी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर उद्घाटनासाठी तिरंगी पट्ट्यांची रिबीन बांधण्यात आली होती.

ओमर अब्दुल्ला रिबीन कापण्यासाठी पुढे आले तेव्हा त्यांचे लक्ष त्यातील रंगांकडे गेले. तिरंगी रिबीन कापणे हा राष्ट्रध्वजाचा अनादर ठरू शकतो हे लक्षात येताच त्यांनी कात्री हातात घेण्यास नकार दिला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अत्यंत शांतपणे ती रिबीन सोडली आमि त्यानंतर व्यवस्थित घडी घालून आयोजकांकडे सोपवली. ही रिबीन कापू नका, ती सन्मानाने बाजूला ठेवा, असेही ते आयोजकांना म्हणाले.

ओमर अब्दुल्ला यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे उपस्थित अधिकारी आणि नागरीकही अवाक झाले. “राष्ट्रध्वजाचे रंग असलेल्या कोणत्याही वस्तूचा वापर अशा प्रकारे करणे अयोग्य आहे. त्याचा मान राखणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.