
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी यांनी शपथ घेतली आहे. नीतीश कुमार यांनी नुकताच राज्यसभेच्या सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सम्राट चौधरी हे बिहारमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
दरम्यान, जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी या घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. किशोरी म्हणाले की आता बिहारचे सरकार गुजरातमधून चालवले जाईल आणि हे भाजपकडून बिहारला दिलेले पहिले ‘बक्षीस’ असल्याचे म्हटले. पक्षाच्या आचरण, चारित्र्य आणि प्रतिष्ठेबाबतच्या दाव्यांवरही त्यांनी टीका केली. उच्च पदावर नियुक्ती करताना त्या व्यक्तीची सखोल पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बिहारची ‘चावी’ आणि ‘रिमोट कंट्रोल’ अमित शाह यांच्या हातात असेल, असा टोला लगावत किशोर म्हणाले की, ही नवी भाजप आहे आणि आता बिहारचे शासन गुजरातमधून चालणार असेही किशोर म्हणाले. सम्राट चौधरी यांचे नाव न घेता त्यांनी नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
याचबरोबर त्यांनी बिहारमधील बेरोजगारी आणि स्थलांतराच्या समस्येवरही चिंता व्यक्त केली. त्यांनी आरोप केला की मोठ्या प्रमाणात बिहारमधील युवक कमी पगाराच्या नोकऱ्यांसाठी गुजरातसह इतर राज्यांकडे स्थलांतर करत राहतील. गुजरातमधील लोक उद्योगांचे मालक राहतील, तर बिहारमधील लोक मजूरच राहतील, असेही त्यांनी म्हटले.

























































