मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ठरतोय ‘डेथ ट्रॅप’; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अवजड वाहन हवेत लटकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामात आता ठेकेदाराच्या मुजोर आणि बेजबाबदार कारभाराची भर पडली आहे. संगमेश्वरमधील पारेख पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी रात्री एका भीषण अपघाताने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. महामार्गाच्या पूर्ण झालेल्या मुख्य रस्त्याची उंची आणि बाजूचा कच्चा रस्ता यामध्ये ठेकेदाराने ठेवलेल्या तब्बल दीड ते दोन फुटांच्या फरकामुळे एक अवजड वाहन हवेत लटकले. या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी हजारो प्रवाशांना मध्यरात्री मोठया वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

महामार्गाच्या एका लेनचे काम पूर्ण झाल्याने त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. मात्र रस्त्याच्या कडांना सुरक्षा कठडे (बॅरेकेटर्स) किंवा रिफ्लेक्टर नसल्याने हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. अपघातातील चालकाने दिलेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशझोतामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही आणि बाजू देताना गाडी थेट दीड फूट खाली कोसळली. सुदैवाने हे वाहन पलटी झाले नाही, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. या भीषण कोंडीत अडकलेली लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

अपघात होऊनही संबंधित ठेकेदार कंपनीचा एकही प्रतिनिधी मदतीला फिरकला नाही. अखेर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने दोन-अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर वाहन बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. आरवली ते कांटेदरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही ठेकेदार कंपनीकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याने, आता प्रशासनाने अशा बेजबाबदार कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.