
मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होण्याचे सत्र गुरुवारीही सुरूच राहिले. सर्वाधिक वर्दळीचे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच (सीएसएमटी) सकाळी सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला आणि ऐन ‘पीक अवर्स’ला प्रवाशांची लोकल ट्रेन आणि स्थानकांत रखडपट्टी झाली. सीएसएमटीकडे येणाऱ्या अनेक गाडय़ांना 30 ते 35 मिनिटांचा विलंब झाल्यामुळे नोकरदारांची गैरसोय झाली. मागील काही दिवसांपासून उपनगरी रेल्वेची सेवा या ना त्या कारणांमुळे कोलमडत आहे. लोकल ट्रेनच्या नियमित वक्तशीरपणावरही मोठा परिणाम झाला आहे. गुरुवारी सेवा विस्कळीत होण्याला सिग्नल यंत्रणेतील बिघाड कारणीभूत ठरला.






























































