
<<आशिष बनसोडे>>
गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकू लागला असून मुंबईत उकाडा प्रचंड वाढला आहे. उन्हाच्या झळांमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रस्त्यावर उभे राहून काम करणाऱया वाहतूक पोलिसांना तर अग्निपरीक्षाच द्यावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेतील वरिष्ठांनी सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांना तब्येतीची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका, डोकं झाकून ठेवा. लिंबूपाणी, ओआरएस पावडर सोबत ठेवा, असा सल्लाही दिला आहे.
मुंबईत उष्णतेचा पारा बराच वाढला आहे. उन्हाच्या चटक्यांबरोबर घामाच्या धाराही वाहत असल्यामुळे शरीरातली पाणी पातळी झपाटय़ाने कमी होत आहे. परिणामी भोवळ आणि उष्माघाताचा धोका वाढू लागला आहे. उन्हातान्हात काम करणाऱ्या पोलिसांसाठी सध्याचे वातावरण काळजी वाढवणारे आहे. हे लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे सहआयुक्त अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त प्रियांका नारनवरे यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना तब्येत सांभाळण्याचे आवाहन केले आहे.
ही काळजी घ्या!
पाण्याची बाटली, लिंबूपाणी, ओआरएस, हेल्थ ओके पावडर कायम सोबत ठेवा.
उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी डोके कायम झाकून ठेवा. कॅप घाला.
वेळोवेळी चेहरा, मानेवर पाणी मारा, शक्य होईल तेव्हा फळं खा.
शरीरातल्या पाण्याची पातळी कमी होणार नाही याची दक्षता घ्या.
काम करत असताना अस्वस्थ वाटू लागल्यास लगेचच जवळच्या दवाखान्यात जा.
त्रास होत असल्यास अंगावर काढू नका.
मधुमेह, उच्चरक्तदाब असणाऱ्या अंमलदारांनी विशेष काळजी घ्यावी.
‘उन्हाचा पारा चढला आहे. वाहतूक व्यवस्था हाताळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला कुठलाही धोका होऊ नये याची खबरदारी आम्ही नेहमीच घेतो. त्याचाच भाग म्हणून आम्ही आता काही सूचना केल्या आहेत. उकाडय़ापासून बचाव करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.’
प्रियांका नारनवरे (अपर पोलीस आयुक्त, वाहतूक)


























































