IPL 2026 – गुजरात अन् गिलची हॅटट्रिक, सलग सहाव्या सामन्यातही कोलकाता विजयाविनाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलकात्याला सलग सहाव्या सामन्यांतही विजयाचे खाते उघडण्यात अपयश आले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलच्या 86 धावांच्या घणाघाती खेळीच्या जोरावर गुजरातने दोन चेंडू आधी कोलकात्याचा पराभव करत आपल्या विजयाची हॅटट्रिक साजरी केली. या विजयानंतर  गुजरातने चौथ्या स्थानी झेप घेतली, तर कोलकाता पाचव्या पराभवानंतर रसातळालाच कायम आहे.

गिलच्या अर्धशतकांचा धडाका कायम

कोलकात्याला 180 धावांत रोखून गुजरातच्या वेगवान त्रिपुटाने अर्धी लढाई पहिल्या डावातच जिंकली होती, तर दुसऱया डावात शुभमन गिलने आपल्या फलंदाजीचा तडाखा कोलकात्यालाही दिला आणि सलग तिसरे अर्धशतक ठोकत गुजरातच्या हॅटट्रिक विजयाचा पाया रचला. एवढेच नव्हे तर त्याने गेल्या चार सामन्यांत 39, 70, 56 आणि 86 धावा ठोकत 251 धावांसह विराट कोहलीच्या डोक्यावर असलेली ‘ऑरेंज’ कॅप उडवली. गिलने 50 चेंडूंत 4 षटकार आणि 8 चौकार खेचताना आघाडीच्या सर्व फलंदाजांसह तीन उपयुक्त भागीदाऱया रचत गुजरातचा विजय सहज केला. गिल बाद झाल्यानंतर कोलकात्याने सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला, पण गुजरातने आरामात शेवटच्या षटकांत आपल्या हॅटट्रिकवर शिक्कामोर्तब केले.

ग्रीनची एकाकी झुंज

गेल्या पाच सामन्यांत विजयाचे खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या अजिंक्य रहाणेने पुन्हा निराशा केली. खुद्द अजिंक्य पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. अंगकृष रघुवंशी आज काही करू शकला नाही. तेव्हा कॅमरून ग्रीनने 79 धावांच्यी झुंजार आणि आक्रमक खेळी करत संघाला 180 धावांपर्यंत पोहोचवले. ग्रीनने आपल्या खेळीत रोव्हमन पॉवेलसह 55 तर अनुकूल रॉयबरोबर 50 धावांची भागी रचली. तिसऱया षटकांत आलेला ग्रीन शेवटच्या चेंडूंवर बाद झाला.