
डगआऊटमध्ये मोबाईलचा वापर केल्याने राजस्थान संघाचे व्यवस्थापक रोमी भिंडर यांना थेट एक लाख रुपयांचा दंड बसला असून बीसीसीआयने त्यांना कडक इशाराही दिला आहे. भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा विभागाने चौकशी पूर्ण केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात भिंडर यांनी डगआऊटमध्ये मोबाईल वापरल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. चौकशीनंतर त्यांनी दिलेले स्पष्टीकरण अंशतः मान्य करण्यात आले. एका विशिष्ट वैद्यकीय कारणामुळे त्यावेळी मोबाईल वापरणे आवश्यक होते, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यांचे उत्तर पूर्णपणे समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि भविष्यात अशी चूक पुन्हा न करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला. या घटनेदरम्यान भिंडर यांच्यासोबत बसलेला युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. चौकशी केवळ भिंडर यांच्या पृतीपुरती मर्यादित ठेवण्यात आली.
नियमांनुसार खेळाडू आणि सामनाधिकारी क्षेत्रात मोबाईल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन वापरण्यास सक्त मनाई आहे. केवळ व्यवस्थापकांना काही प्रशासकीय कारणांसाठी वेगळ्या जागेत मोबाईल वापरण्याची मुभा असते, मात्र डगआऊटमध्ये त्यावर पूर्ण बंदी आहे.





























































