
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या १ जूनपासून राज्यातील सर्वच बसस्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी येथे केली.
प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो. त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार असून, खासगी कंत्राटदारांमार्फत चालविली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून महामंडळ स्वतः त्याची जबाबदारी घेणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शासन निधीतून बांधलेल्या चार नूतन बस स्थानकांच्या उद्घाटनानिमित्त मंत्री सरनाईक कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकांतील स्वच्छतागृह, उपाहारगृह, हिरकणी कक्ष आणि प्रवासी कक्षांची पाहणी केली. त्यावेळी प्रवाशांशी थेट संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.


























































